आमिर खानने काल सोशल मीडियावर शेवटची पोस्ट टाकत तो सोशल मीडियाला रामराम ठोकत असल्याचे सांगितले होते. आमिर खान सोशल मीडियापासून दूर झाला असला तरी त्याच्या जुन्या पोस्ट त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला पाहायला मिळतील असे त्याच्या चाहत्यांना वाटले होते. पण आता त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
आमिरने त्याची शेवटची पोस्ट काल सोशल मीडियावर शेअर केली होती आणि आता त्यानंतर त्याने त्याचे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवरचे अकाऊंट डीलिट केले आहे. त्यामुळे त्याच्या जुन्या पोस्ट देखील त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार नाहीत. त्याच्या आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडियावरील अकाऊंटमार्फत तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहाणार आहे.
आमिर खानने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्याने या पोस्टमध्ये सांगितले होते की, ही त्याची शेवटची पोस्ट असून तो सोशल मीडियाला रामराम ठोकत आहे. त्याला त्याचे संपूर्ण लक्ष कामाकडे केंद्रित करायचे असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. आमिरच्या आगामी चित्रपटांविषयी, तसेच त्याच्याविषयी अपडेट्स त्याच्या चाहत्यांना आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर पाहायला मिळतील.
आमिरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. मला तुम्हाला एक बातमी सांगायची आहे की, ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट असणार आहे. तसाही मी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो आणि आता मी सोशल मीडिया पूर्णपणे सोडण्याचे ठरवले आहे. आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर माझ्याविषयी तुम्हाला जाणून घेता येईल. आपण पूर्वी ज्याप्रकारे संवाद साधत होतो, त्याप्रमाणे पुढे देखील मी तुमच्या संपर्कात असणार आहे.