1987 चा क्लासिक सिनेमा ‘मिस्टर इंडिया’ (Mr. India ) हा चित्रपट विसरणं शक्यच नाही. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) यालाही या चित्रपटात काम करायचं होतं. अर्थात अभिनेता म्हणून नव्हे तर असिस्टंट डायरेक्टर म्हणून. पण आमिरला रिजेक्ट केलं गेलं. या रिजेक्ट करण्यामागचं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. होय, आमिरने स्वत: हा खुलासा केला.
आमिरने सांगितलं...मला शेखर कपूर यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचं होतं. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचं होतं. पण त्यावेळी शेखर कपूर यांचे चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणारे सतीश कौशिक यांनी मला रिजेक्ट केलं. मी गेलो, शेखर कपूर यांना भेटलो. ते माझे आवडते दिग्दर्शक होते. मला तुमच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचं आहे, असं मी त्यांना म्हणालो. मी माझं पेपरवर्क त्यांना दाखवलं. माझं पेपरवर्क पाहून ते चांगलेच प्रभावित झाले होतं. कारण त्यावेळी इंडस्ट्रीत कुणीही असं पेपरवर्क करत नव्हतं. पण तरिही मला रिजेक्ट करण्यात आलं. मला शेखर कपूर यांनी नाही तर त्यांचे चीफ असिस्टंट डायरेक्टर सतीश कौशिक यांनी रिजेक्ट केलं होतं. याचं कारण मला नंतर कळलं..., असं आमिरने ‘ह्युमंस ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
काय होतं रिजेक्ट करण्याचं कारण...?
सतीश कौशिक यांनी आमिरला रिजेक्ट केलं. त्याचं कारण मोठं मजेशीर होतं. आमिरने त्याचाही खुलासा केला. त्याने सांगितलं, ‘मिस्टर इंडिया’साठी मी रिजेक्ट झालो. मी निराश झालो होतो. पुढे मला यामागचं कारण कळलं. खुद्द सतीशने मला कारण सांगितलं होतं. ‘यार, तू त्यादिवशी गाडी घेऊन भेटायला आला होता आणि माझ्याकडे गाडी नव्हती. माझ्याकडे कार नाही आणि माझा ज्युनिअर कारमधून येतो, हे कसं जमणार होतं, म्हणून मी तुला रिजेक्ट केलं,’असं खुद्द सतीशने मला सांगितलं. ते ऐकून मी थक्क झालो होतो. कारण मुळात माझ्याकडेही स्वत:ची गाडी नव्हती. त्यादिवशी एका कामासाठी मला गाडी मिळाली होती आणि ती गाडी घेऊन मी शेखर कपूर यांना भेटायल गेलो होतो. पण त्या गाडीमुळे शेखरने मला असिस्टंट डायरेक्टर म्हणून ठेवण्यास नकार दिला. कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.’
मि. इंडिया हा सिनेमा शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. यात अनिल कपूर, श्रीदेवी, अमरिश पुरी मुख्य भूमिकेत होते. सतीश कौशिक यांनी यात कॅलेंडरची भूमिका साकारली होती. शिवाय ते या चित्रपटाचे चीफ असिस्टंट डायरेक्टरही होते.