आमिर खान हा बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. आमिरला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. जाहिराती, सिनेमे अशी माध्यमं आमिरने त्याच्या अभिनयाने गाजवली आहेत. अशातच आमिर पहिल्यांदाच द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये सहभागी झालेला. त्यावेळी आमिरने सर्वांना नमस्कार करण्याचं महत्व सांगितलं. त्यासाठी आमिरने खास किस्साही सांगितला.
आमिर खान 'दंगल' सिनेमाचं शूटींग पंजाब करत होता. तेव्हा लोकं दरवाज्यावर उभं राहून त्याला हात जोडून नमस्कार करायचे. दीड महिना आमिर पंजाबमध्ये 'दंगल' सिनेमाचं शूटींग करत होता. कधीकधी भल्या पहाटे आमिर शूटींग करायचा. त्यावेळीही पंजाबमधील माणसं त्याला हात जोडून नमस्कार करायचे. याशिवाय जेव्हा रात्री शूटींग संपवून पॅक अप व्हायचं तेव्हाही ती माणसं आमिरला नमस्कार करायची.
पंजाबी लोकांची ही गोष्ट आमिरला खूप आवडली. त्यामुळे द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये खुलासा केला की, "मी मुस्लिम असल्यामुळे मला हात जोडण्याची सवय नाही. मला आदाब करायची सवय आहे. पण त्या दीड महिन्यांच्या काळात मला नमस्कार करण्याची ताकद समजली." द ग्रेट इंडियन कपिल शो चा आमिर खान स्पेशल नवीन भाग काल २७ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.