बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) काही दिवसांपूर्वीच दुस-या पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. साहजिकच या घटस्फोटाची जोरदार चर्चा झाली. यानंतर आमिर चर्चेत आला तो लडाखमध्ये प्रदूषण पसरवत असल्याच्या आरोपांमुळे. ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाचं लडाखमध्ये शूटींग सुरू असताना या चित्रपटाच्या टीमनं गावात सर्वत्र कचरा पसरवण्याचा आरोप करण्यात आला. केवळ आरोप नाही तर पुराव्यादाखल या ग्रामस्थांनी याचा व्हिडीओही शेअर केला.
लडाखमधील वाखा गावचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. गावात सर्वत्र प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा सर्वत्र विखुरलेला या व्हिडीओत दिसले. आता या आरोपांना आमिरच्या प्रॉडक्शल हाऊसनं उत्तर दिलंय.
काय दिलं उत्तर..
आमिर खान व त्याच्या संपूर्ण टीमवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. आम्ही एक कंपनी या नात्यानं शूटींगचं स्थळ आणि आजुबाजूच्या परिसराच्या स्वच्छतेबाबत अगदी कडक प्रोटोकॉल पाळतो. संपूर्ण ठिकाण कचरा मुक्त असावे, याबाबत आमची टीम दक्ष असते. दरदिवशी शूटींग संपल्यानंतर संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते. शेड्यूल संपल्यानंतर शूटींग स्थळ सोडण्यापूर्वी त्या परिसराची पूर्ण स्वच्छता केली जाते. पूर्ण स्वच्छता झाल्यानंतरच आम्ही रवाना होतो. आम्ही कचरा पसरवला, हा आरोप त्यामुळंच आम्हाला अमान्य आहे. आमचे शूटींग लोकेशन्स संबंधित स्थानिक अधिका-यांसाठी खुले आहेत, ते वाटेल तेव्हा पाहणी करू शकतात, असं आमिर प्रॉडक्शननं त्यांच्या इन्स्टाग्रामवर जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.