Join us

'लगान' नक्कीच फ्लॉप होणार, जावेद अख्तरांनी केली होती भविष्यवाणी; आमिरने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:26 IST

जावेद अख्तर असं का म्हणाले होते? आमिरने सांगितलं कारण

भारतीय सिनेमांच्या इतिहासातील सर्वात गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे आमिर खानचा (Aamir Khan) 'लगान' (Lagaan). अप्रतिम गोष्ट, तेवढाच ताकदीचा अभिनय, सुंदर गाणी यामुळे सिनेमा सुपरहिट झाला. आशुतोष गोवारीकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा त्यांचा सर्वोत्कृष्ट सिनेमा होता. या सिनेमाला ऑस्करसाठी नॉमिनेटही केलं होतं. पण तुम्हाला माहितीये का जावेद अख्तर यांनी 'लगान' फ्लॉप होईल असा अंदाज वर्तवला होता. नुकतंच आमिर खानने हा किस्सा सांगितला.

'इंडिया टुडे'च्या इव्हेंटमध्ये आमिर खान म्हणाला,"लगान सिनेमाच्या वेळी मी खूप घाबरलो होतो. जावेद अख्तर यांनी सिनेमाच्या संकल्पनेवरच अविश्वास दाखवला होता. त्यांनी मला फोन करुन बोलवून घेतलं होतं. ते म्हणाले, 'तू का ही चूक करतोय? हा सिनेमा का बनवतोय? एक दिवसही चालणार नाही. खेळावर, क्रिकेटवर बनवलेला कोणताही सिनेमा चालला नाही. तू यामध्ये जुना काळ दाखवणार आहेस, कोण समजून घेणारे? इथे लोक स्वित्झर्लंडला जाऊन शूट करत आहेत आणि तू एका गावाची गोष्ट दाखवणार आहेस. त्यात तू यासाठी अमिताभ बच्चन यांना नरेशनसाठी घेतलं आहेस. ते ज्या सिनेमाच्या इंट्रोला आवाज देतात तो सिनेमा फ्लॉप होतो. लगान नक्कीच फ्लॉप होणार हे निश्चित आहे."

'लगान' सिनेमाकडून कोणालाच अपेक्षा नव्हती. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर तुफान चालला. या अनोख्या कहाणीने प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. २००१ साली रिलीज झालेल्या या सिनेमाला २४ वर्ष झाली आहेत. तरी आजही सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

टॅग्स :आमिर खानजावेद अख्तरबॉलिवूड