चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मिचाँग या चक्रीवादळामुळेचेन्नईत पाऊस पडून अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे तेथील जनजीवनही विस्कळीत झालं आहे. चेन्नईतील भयावह परिस्थिती दाखवणारे अनेक व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चेन्नईतील या पुरात अनेक नागरिकही अडकून पडले आहेत. चेन्नईतील या पुराचा फटका बॉलिवूड अभिनेता आमिर खानलाही बसला आहे.
आमिर खानही इतर नागरिकांप्रमाणे चेन्नईच्या पुरात अडकला होता. जवळपास २४ तासानंतर बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आमिर खानची सुटका करण्यात आली आहे. त्याचे फोटो विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत.
दरम्यान, दक्षिण बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ निर्माण झाल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये सतत पाऊस पडत असून, वीजपुरवठा खंडित होऊन पाणी साचले आहे. अनेक गाड्याही या पाण्यात वाहून गेल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या मरीना बीचला पूर आला असून अनेक सखल भागात पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.