Join us

'आले तुफान किती..' गाण्यावर आमिरच्या जावयाचं हटके रील, असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:00 IST

लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नुपूर शिखरेने हा कॉमेडी व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने (Ira Khan) गेल्या वर्षी मराठमोळ्या नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधली होती. दोघं बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्याचा लग्नसोहळाही फार हटके पद्धतीने झाला होता. दोघांचं रजिस्टर मॅरेज झालं आणि यासाठी नवरा मुलगा चक्क बनियन आणि शॉर्ट्सवर आला होता. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. साधारणपणे अनेक जोडपी लग्नाचा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करतात. नुपूरने मात्र आयराला शाल आणि पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.

आयरा खान आणि नुपूर शिखरे हे जोडपं खूपच हटके आणि साधं आहे.  आमिर खानची लेक असूनही आयरा अगदी साधी राहते. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नुपूर शिखरेने हा कॉमेडी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो आयराला आधी शाल देतो. यानंतर शाल आणि पुष्पगुच्छ देतो. दोघंही फोटोसाठी अगदी ऑकवर्ड पोज देतात. या व्हिडिओमागे नुपूरने नेहमी व्हायरल होत असलेलं 'आले तुफान किती जिद्द ना सोडली...' हे गाणं लावलं आहे. यासोबत नुपूरने कॅप्शन देत लिहिले,  "माझ्या सोबत लग्न करायच धाडस दाखवण्या साठी, आणि एक अख्ख वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्या बद्दल, मी माझी मिसेस, सौ. आयरा खान हिचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार करतो."

त्यांच्या या व्हिडिओवर अनेक मराठी कलाकार, मित्रमंडळींनाही हसू आवरलेलं नाही. नुपूरच्या या हटके व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. लग्नही हटके आणि आता लग्नाचा वाढदिवसही अगदी हटकेच. नुपूर शिखरे हा मराठी कुटुंबातील असून फिटनेस ट्रेनर आहे. काही वर्षांपूर्वी तो आमिर खानला ट्रेनिंग देत होता.  तेव्हाच नुपूर आणि आयराची ओळख झाली होती. दोघांची मैत्री झाली मग ते प्रेमात पडले. गेल्यावर्षीच त्यांनी अगदी थाटात लग्न केलं. रजिस्टर मॅरेज आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीनेही त्यांचं लग्न झालं होतं.

टॅग्स :इरा खानसोशल मीडियालग्न