Join us

मानसिक आरोग्यावर भरभरुन बोलला आमिर खान, म्हणाला, 'अनेक वर्षांपासून मुलीसोबत थेरेपी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 3:33 PM

आमिर खानने तो गेल्या काही वर्षांपासून थेरपी घेत असल्याचा खुलासा केलाय.

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लेक ईरा खान (Ira Khan) काही वर्ष डिप्रेशनमध्ये होती. तिने यातून बाहेर पडण्यासाठी थेरपीची मदत घेतली. ईरा खानने अनेकदा हे मान्य केलं आहे की तिला डिप्रेशन येतं. आता स्वत: आमिर खाननेही तो गेल्या काही वर्षांपासून थेरपी घेत असल्याचा खुलासा केला. व्हिडिओ शेअर करत आमिर आणि ईरा या बापलेकीने  मानसिक आरोग्याबाबतीत जागरुकता निर्माण केली.

आज 'वर्ल्ड मेंटल हेल्थ डे' आहे. यानिमित्ताने ईरा खानने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये आमिर खान आणि ईरा दिसत आहेत. ते म्हणतात,'गणित शिकण्यासाठी जसं आपण शिक्षकांकडे जातो, केस कापण्यासाठी आपण सलूनमध्ये जातो,घरी जर प्लंबिंग, फर्निचरचं काम असेल तर आपण त्याच्याकडे जातो ज्यांना हे काम माहित आहे, आजारी असाल तर डॉक्टरकडे जातो. आयुष्यात अशी अनेक कामं आहेत जी आपण स्वत: करु शकत नाही. आपल्याला काही वेळेस दुसऱ्यांची मदत लागते ज्याला काम माहित आहे. असे निर्णय आपण खूपच सहजतेने न लाजता घेतो.'

ते पुढे म्हणतात, 'याचप्रमाणे जेव्हा आपल्याला मानसिक गरज असते तेव्हा याच सहजतेने न लाजता आपण अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे जो आपली मदत करु शकतो.'

आमिर खान पुढे असंही म्हणाला की,'मी आणि ईरा आम्ही अनेक वर्षांपासून थेरपीचा लाभ घेत आहोत. जर तुम्हाला वाटतंय की तुम्हीही मानसिक किंवा कोणत्या दु:खात आहात तर तुम्हीही अशी व्यक्ती शोधा जी प्रोफेशनल आहे, ट्रेन्ड आहे, जी तुमची मदत करु शकेल. यात काहीच लाज वाटण्यासारखं नाही. ऑल द बेस्ट.'

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर त्याचा शेवटचा रिलीज झालेला 'लाल सिंह चड्डा' सिनेमा जोरदार आपटला. आता तो सनी देओलला घेऊन 'लाहोर 1947' सिनेमाची निर्मिती करण्याच्या तयारित आहे. तर दुसरीकडे त्याची लेक ईरा खानचा नुकताच साखरपुडा झाला असून ती लवकरच नुपूर शिखारे या मराठमोळ्या फिटनेस ट्रेनर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

टॅग्स :आमिर खानइरा खानमानसिक आरोग्यबॉलिवूड