आमिर खान (Aamir Khan) तब्बल चार वर्षानंतर लाल सिंग चड्ढा बनून परतला होता. पण त्यानं सगळ्यांचीच निराशा केली. त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha ) हा सिनेमा दणकून आपटला. आमिरच्या सिनेमाला प्रेक्षक मिळणार नाही,असा विचार कुणी स्वप्नातही केला नव्हता. पण झालं तेच. आता जरा डॅमेज कंट्रोलबद्दल बोलू या. तर आता आमिर खान डॅमेज कंट्रोल करण्यास पुढे सरसावला आहे. होय, ‘लाल सिंग चड्ढा’ला जे नुकसान झालं, त्याची भरपाई आमिर स्वत: करणार आहे.बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट न चालल्यामुळे झालेल्या नुकसानाची जबाबदारी आमिरने आपल्या खांद्यावर घेत या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनावर पाणी सोडलं आहे. या चित्रपटासाठीची अॅक्टिंग फी न घेण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. असं करून काय साध्य होणार? तर, नुकसानाची थोडीफार भरपाई नक्कीच होणार.
आमिरने ‘लाल सिंग चड्ढा’साठीची संपूर्ण फी घेतली तर प्रोड्यूसरला सुमारे 100 कोटीचं नुकसान सहन करावं लागेल. फी न घेण्याच्या निर्णयामुळे निर्मात्याच्या झालेल्या तोट्याचा आकडा काही प्रमाणात भरून निघणार आहे. त्यामुळेच आमिरने चित्रपट फ्लॉप होण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत, फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.सूत्रांच्या मते, आमिरने या चित्रपटासाठी आपली चार वर्षे दिली होती. पण या चित्रपटापासून त्याने एक रूपयाचीही कमाई केली नाही. आता यात किती तथ्य आहे, हे माहित नाही. कारण अद्याप यावर आमिरचं ऑफिशिअल स्टेटमेंट आलेलं नाही. पण चर्चा तर हीच आहे.
‘लाल सिंग चड्ढा’वर 180 कोटींचा खर्च झाला होता. 20 दिवसांत या चित्रपटाने केवळ 60 कोटींचा बिझनेस केला. 11 ऑगस्टला सिनेमा रिलीज झाला. पण या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकलेच नाहीत. हॉलीडे वीकेंडचाही चित्रपटाला फायदा झाला नाही. परिणामी पहिल्या आठवड्यानंतर या चित्रपटाचे अनेक शो कॅन्सल करण्याची वेळ वितरकांवर आली. याआधी ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’च्या फ्लॉपची जबाबदारी आमिरने स्वीकारली होती.