आमिर खानच्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाला समीक्षकांनी झोडपले आणि नंतर प्रेक्षकांनीही या सिनेमाकडे पाठ फिरवली. एकंदर काय तर ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ फ्लॉप झाला. हा सिनेमा फ्लॉप झाल्याची जबाबदारी आमिरने स्वीकारून प्रेक्षकांची माफी देखील मागितली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना आमिर म्हणाला होता की, मी तुमच्या अपेक्षांवर खरा उतरू शकलो नाही. मी या चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आमचे काहीतरी चुकले असावे. अर्थात काही लोकांना हा चित्रपट अतिशय आवडलाही. प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने माझा चित्रपट पाहण्यासाठी आले असतील. पण मी त्यांचे मनोरंजन करू शकलो नाही. हा माझ्यासाठी एक दु:खद अनुभव आहे. कारण माझे काम आणि माझे चित्रपट यापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही. मी माझ्या पोटच्या मुलांसारखा माझ्या चित्रपटांवर प्रेम करतो.
आमिरला त्याचा हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने एक खूप मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. आमिर सध्या महाभारत या त्याच्या मेगाबजेट चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटासाठी तो संशोधन करत असून यात तो चांगलाच व्यग्र आहे. यासोबतच आगामी काळात तो आणखी तीन-चार चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा होती. पण ठग्स ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने त्याचे पुढील काही प्रोजेक्ट सध्या होल्डवर टाकले आहे. मोगुल या गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये तसेच ओशोंच्या बायोपिकमध्ये तो झळकणार होता. तसेच फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा तो रिमेक करणार होता. पण आमिरने त्याचे हे सगळे चित्रपट सहा महिन्यांसाठी होल्ड वर टाकले असल्याचे म्हटले जात आहे.
‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा एक पीरियड ड्रामा आहे. यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट भारतात ५००० स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. आमिर आणि अमिताभ या जोडीने या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या दोघांशिवाय कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेखही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.