अलका याज्ञिक ( Alka Yagnik ) यांचं नाव घेताच आठवतो तो त्यांचा सुरेल आवाज. वयाच्या 14-15 व्या वर्षी अलका यांना पहिला ब्रेक मिळाला. ‘पायल की झंकार’ या सिनेमासाठी पार्श्वगायन करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर ‘लावारिस’ या सिनेमातील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणं त्यांनी गायलं. ही गोष्ट आहे 1981 सालची. मात्र इतके सुपरहिट गाणी देऊनही त्यांना पुढची संधी मिळाली ती थेट 1988 साली.
माधुरीच्या ‘एक दोन तीन’ या गाण्यासाठी त्यांनी आवाज दिला आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. 20 हजारांवर गाणी गाणा-या याच अलकांचा एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा आमिर खानशी (Aamir Khan ) संबंधित आहे आणि म्हणूनच खास आहे.
तर आमिरचा ‘कयामत से कयामत तक’ (Qayamat Se Qayamat Tak) हा पहिला सिनेमा रिलीज होणार होता आणि या चित्रपटाच्या गाण्यांच्या गायिका होत्या अलका याज्ञिक. अलका रेकॉर्डिंगसाठी पोहोचल्या आणि रेकॉर्डिंग सुरू झालं. पण रेकॉर्डिंग सुरु असताना एक मुलगा अगदी टक लावून अलका यांच्यांकडे बघत होता. अलकांनी आधी तर दुर्लक्ष केलं. पण त्या मुलाची नजर हटेना. मग मात्र अलकांना राहावलं नाही. त्यांनी त्या मुलाला स्टुडिओतून बाहेर काढलं. तो सुद्धा मुकाट बाहेर निघून गेला. गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर निर्माता नासीर हुसैन यांनी अलका यांना सिनेमाच्या स्टारकास्टला भेटण्याचं निमंत्रण दिलं. अलका सर्वांना भेटल्या आणि अचानक तो मुलगा पुन्हा त्यांच्या समोर आला. हो, स्टुडिओतून ज्याला हाकलून लावले होते, तोच तो मुलगा. हा मुलगा अन्य कुणी नाही तर आमिर खान होता. सिनेमाचा हिरो होता. अलकांनी लगेच आमिरची माफी मागितली. आजही या सिनेमाचा उल्लेख होतो, तेव्हा अलकांना हा किस्सा हटकून आठवतो.