गत तीन वर्षांत आमिर खानचा भाचा इमरान खान हा एकाही चित्रपटात दिसलेला नाही. २०१५ मध्ये कंगना राणौतसोबत ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात तो दिसला. पण तो चित्रपट आपटला आणि या चित्रपटासोबतचं इमराचे फिल्मी करिअरही आपटले. यानंतर मोठ्या पडद्यावर इमरानची साधी झलकही दिसलेली नाही. मध्यंतरी मामू आमिर खानने इमरानला मदतीचा हात दिल्याची बातमी आली़.‘महाभारत’ या आपल्या ड्रिम प्रोजेक्टमध्ये आमिर इमरानला कास्ट करणार, असे सांगितले गेले. पण इथेही माशी शिंकली. मामूने कास्ट करण्याआधी हा प्रोजेक्ट थंडबस्त्यात पडला. म्हणजे इमरानच्या तोंडी आलेला घासही गेला. याने झाले एक की, अभिनयात आपली डाळ शिजणारी नाही, हे इमरानला उशीरा का होईना कळाले आणि हे कळल्यानंतर त्याने दुसरीकडे हातपाय मारणे सुरु केले. होय, ताज्या बातमीनुसार, अॅक्टिंगसोडून इमरानने आता दिग्दर्शनात हात आजमावयाचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, इमरानला पहिला प्रोजेक्टही मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘धर्मा2.0’साठी इमरानने नुकतीच एक जाहिरात दिग्दर्शित केली. ‘धर्मा2.0’ ही एक प्रॉडक्शन कंपनी आहे. ही कंपनी जाहिराती करते. याच कंपनीने इमरानला ही संधी दिली. तूर्तास इमरानच्या या प्रोजेक्टबाबत फार काही माहिती समोर आलेली नाही. इमराननेही याला अधिकृत खुलासा केलेला नाही. कदाचित योग्यवेळी तो खुलासा होईल. पण एक मात्र खरे की, इमरानच्या हाताला काम मिळाले.
इमरान खान याने २००८ साली आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटापासून धमाकेदार सुरुवात केली होती. मात्र पहिल्या चित्रपटाव्यतिरिक्त त्याला फारसे यश मिळू शकले नाही. इमरानने अवंतिका मलिक हिच्याशी २०११ साली विवाह केला. यानंतर २०१४ मध्ये त्यांची मुलगी इमाराचा जन्म झाला होता.