Join us  

आमिरला काढले होते खोलीबाहेर

By admin | Published: April 08, 2017 3:14 AM

अलका याज्ञिक यांनी कयामत से कयामत तक या चित्रपटाच्या वेळेचा एक किस्सा सांगितला

अलका याज्ञिक यांनी कयामत से कयामत तक या चित्रपटाच्या वेळेचा एक किस्सा सांगितला. या चित्रपटातील गजब का है दिन या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी अलका याज्ञिक यांनी आमिर खानला खोलीबाहेर काढले होते. माय लाइफ, माय स्टोरी या कार्यक्रमात सेलिब्रेटी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगतात, असाच एक किस्सा अलकाने नुकताच या कार्यक्रमात सांगितला. अलका सांगते, ‘मी कयामत से कयामत तक या चित्रपटातील गजब का है दिन या गाण्याचे ध्वनिमुद्रण करत होते. तेव्हा माझ्या रेकॉर्डिंगच्या खोलीत एक देखणा मुलगा बसला होता. सुरुवातीला तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि माझा गाण्याचा सराव करीत राहिले. पण, गाणे प्रत्यक्ष ध्वनीमुद्रित करण्याची वेळ आली तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले. तुम्ही गात असताना कोणीतरी तुमच्याकडे एकटक पाहत आहे असे तुम्हाला जाणवले, तर तुम्ही अस्वस्थ होता, असे मला वाटते. त्यामुळे मी त्याला त्या खोलीच्या बाहेर जायला सांगितले. तोसुद्धा काहीही न बोलता तिथून निघून गेला. गाण्याचे मुद्रण झाल्यानंतर दिग्दर्शक मन्सूर खान यांनी या चित्रपटातील नायकाशी माझी ओळख करून दिली. त्याक्षणी मला प्रचंड लाज वाटली. कारण याच नायकाला मी काही वेळापूर्वी खोलीच्या बाहेर काढले होते. त्यानंतर आजपर्यंत आम्ही जेव्हा-जेव्हा भेटतो, तेव्हा-तेव्हा तो मला त्या गोष्टीची आठवण करून देतो आणि आम्ही दोघेही त्यावर जोरजोरात हसतो.