राज चिंचणकरवर्षानुवर्षांच्या सहवासाने नाती घट्ट होत जातात आणि लोणच्यासारख्या मुरलेल्या या नात्यांचा स्वाद अधिकच हवाहवासा वाटू लागतो. अनेकदा नात्यांचे पदर अलवारपणे उलगडत जातात आणि जुन्या नात्यांची ओळख नव्याने पटू लागते. कधी रुसवे, कधी फुगवे, कधी प्रेम, तर कधी दुरावा अशी आंबटगोड पखरण या नात्यांमध्ये होत राहते आणि त्यातूनच नात्यांची खुमारी दिवसेंदिवस वाढत जाते. असे सर्व काही छानपैकी जुळून आले, की मग या नातेसंबंधांची रुचकर पंगत मांडणारा ‘मुरांबा’ व्हायला वेळ लागत नाही.‘मुरांबा’ हा चित्रपट दोन पिढ्यांच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकत त्यांच्यातले धागे उलगडतो. आई, बाबा, मुलगा आणि होणारी सून अशा चौघांच्या माध्यमातून ही नाती रंगत आणतात. आलोक आणि इंदू तीन वर्षे एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या घरी हे माहीत आहे आणि त्यांच्या साखरपुड्याचेही आता वेध लागले आहते, पण अचानक त्यांचे ‘ब्रेक-अप’ झाल्याची बातमी आलोक त्याच्या आईबाबांना सांगतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जे जे काही घडते, त्याची ही गोष्ट आहे.कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी ‘सबकुछ’ जबाबदारी स्वीकारलेल्या वरुण नार्वेकर याने हा ‘मुरांबा’ चवदार बनवला आहे. नात्यांचा फर्मास ‘बेस’ तयार करून, त्यावर कापलेल्या फोडींची व्यवस्थित पखरण करून, त्याला वेलची-जायफळचा तडका देत, त्याने ही ‘रेसिपी’ स्वादिष्ट केली आहे. सरळ, साधी गोष्ट आणि तिची सहज मांडणी अशी प्रक्रिया अवलंबत आणि उगाच कसलाही वायफळ अविर्भाव न आणता, त्याने केलेली ही कामगिरी स्तुत्य आहे. चार प्रमुख व्यक्तिरेखांच्या स्वभावाचे प्रतिबिंब अधिकाधिक कसे ठसत जाईल, याची भक्कम तजवीज करत, त्याने हा ‘मुरांबा’ गोडाच्या पाकात मस्त घोळवला आहे. त्याचप्रमाणे, मिलिंद जोग यांचा कॅमेरा, विशाल बाटे यांचे संकलन, तसेच हृषिकेश, जसराज, सौरभ यांची संगीतसाथ सुयोग्य आहे. अमेय वाघ (आलोक) आणि मिथिला पालकर (इंदू) या दोघांनी चित्रपटाभर चांगली अदाकारी पेश करत, चित्रपटाला फ्रेशनेस बहाल केला आहे. प्रेम, ब्रेक-अप, करिअर अशा गुंत्यात अडकलेला आलोक, अमेयने त्याच्या स्टाईलने रंगवला आहे. मिथिलाने पदार्पणातच मोठी झेप घेतली असून, तिच्याविषयीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या दोघांच्या बरोबरच, सचिन खेडेकर यांनी साकारलेले बाबा भाव खाऊन जातात. त्यांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी भूमिका त्यांना यात मिळाली आहे आणि अनोख्या पद्धतीने साकारलेला त्यांचा हा बाबा ‘लव्हेबल’ झाला आहे. चिन्मयी सुमीत हिनेसुद्धा आईच्या भूमिकेत उत्तम रंग भरले आहेत. तिच्या वाट्याला आलेल्या प्रसंगांमध्ये तिने लक्षवेधी कामगिरी करीत छाप पाडली आहे. ऐन उन्हाळ्यात तोंडाची गेलेली चव पुन्हा मिळवायची असेल, तर या ‘मुरांबा’ची फोड जिभेवर ठेवणे क्रमप्राप्त आहे, जेणेकरून तोंडाचा स्वाद बदलत उंबरठ्यावर आलेल्या पावसाची सुखद चाहूलही लागून जाईल.
आंबटगोड नात्यांची रुचकर पंगत!
By admin | Published: June 05, 2017 12:49 AM