बॉलिवूडमधील ८० ते ९० चा काळ खऱ्या अर्थाने सोन्याचा काळ होता असं म्हणता येईल. या काळात अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपटांची निर्मिती झाली. आजही या काळातील चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे आँखे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. विशेष म्हणजे या सिनेमात एका माकडाला सर्वाधिक मानधन दिल्याचं समोर आलं आहे.
१९९३ मध्ये डेविड धवन यांचा आँखे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमामध्ये गोविंदा आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत झळकले होते. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत एक माकडही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलं होतं. या माकडाला कलाकारांपेक्षाही जास्त मानधन देण्यात आलं होतं. अलिकडेच एका मुलाखतीत चंकी पांडे यांनी खुलासा केला.
'आँखे' या सिनेमाचे तब्बल १२ आठवडे बॉक्स ऑफिसवर हाऊसफूल शो सुरु होते. या सिनेमासाठी कलाकारांना तगडं मानधन देण्यात आलं होतं. परंतु, या कलाकारांपेक्षाही त्यात काम करणाऱ्या माकडाला जास्त मानधन दिलं होतं. या सिनेमामध्ये गोविंदापेक्षा जास्त फी माकडाने म्हणजेच त्याच्या मालकाने घेतली होती, असं चंकी पांडेने मुलाखतीत सांगितलं.
दरम्यान,५ कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने ४६ कोटींची कमाई केली होती. मात्र, या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान चंकी पांडेला अनेक वेळा माकडाने चावा घेतला होता. ज्यामुळे त्याला सेटवर इंजक्शन घेऊन काम करावं लागलं होतं.