Aaradhya Bachchan : बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक नवं अपडेट समोर आलं आहे. होय, काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिच्याबद्दलची एक बातमी व्हायरल झाली होती. नंतर ती फेक न्यूज असल्याचं सिद्ध झालं होतं. पण बच्चन कुटुंब यामुळे प्रचंड संतापल्याचं कळतंय. त्यामुळे आता बच्चन कुटुंबाने ही फेक न्यूज देणाऱ्या काही युट्यूब चॅनल्सच्या विरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावत कारवाईची मागणी केली आहे.
आराध्या बच्चनचं आयुष्य आणि तिच्या आरोग्याविषयी ही फेक न्यूज चालवण्यात आली होती. याविरोधात बच्चन कुटुंब हायकोर्टात गेलं आहे. रिपोर्टनुसार, दहा युट्यूब चॅनल्सना आराध्याबद्दलचे फेक व्हिडीओ ‘डी-लिस्ट’ आणि ‘डिॲक्टिव्हेट’ करण्याचे आदेश देण्याची विनंती बच्चन कुटुंबाने केली आहे. आराध्या सध्या अल्पवयीन आहे. हा तिच्या खासगी आयुष्याचा भंग असून बच्चन कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं बच्चन कुटुंबाने आपल्या अर्जात म्हटले आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर आज २० एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. बच्चन कुटुंबाने यासंदर्भात कुठलेही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेलं नाही. शिवाय प्रतिक्रियाही दिलेली नाही.
आराध्या बच्चन सतत लाईमलाईटमध्ये असते. ती मुंबईच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिकते आहे. १६ नोव्हेंबर २०११ जन्मलेली आराध्या ११ वर्षांची आहे. आई ऐश्वर्यासोबत ती सतत दिसते. अलीकडे नीता व मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमातही ती आईसोबत हजर होती.डिसेंबर 2021 मध्ये अभिषेक बच्चनने लेक आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. “मी स्वत: सेलिब्रिटी असल्याने माझ्यावर झालेल्या टीकांना मी सहन करू शकतो पण आराध्याला ट्रोल करणं चुकीचं आहे. ते मी सहन करणार नाही. मी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे मला ट्रोल करण्यापर्यंत ठीक आहे. पण माझ्या मुलीला त्यात ओढू नका,” असं तो म्हणाला होता.