Join us

क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की...; अभिनेता आरोह वेलणकरनं Kranti Redkarसाठी केलं ट्वीट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 1:30 PM

Aryan Khan Drugs Case, Sameer Wankhede : एकही मराठी कलाकार अद्याप क्रांतीच्या पाठिंब्यासाठी पुढे का येत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता आरोह वेलणकरने ट्वीट केलं आहे.

ठळक मुद्देसमीर वानखडेंना पाठींबा दिला तर पुढे चित्रपटसृष्टीत काम मिळणार नाही, अशी भीती अनेक कलाकारांच्या मनात आहेत, असे क्रांती या पत्रकार परिषदेत म्हणाली होती.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे (Aryan Khan Drugs Case) महाराष्ट्रीतील राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर एक ना अनेक आरोप केले आहेत. अगदी समीर वानखेडेंचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफीयांशी संबंध आहेत, त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे,असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंवरच्या या गंभीर आरोपांवर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, स्ट्राँग राहा असं बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील लोक लपून मेसेज करत आहेत. पण ते सर्वजण सोशल मीडियावर येण्यास घाबरत आहेत. समीर वानखडेंना पाठींबा दिला तर पुढे चित्रपटसृष्टीत काम मिळणार नाही, अशी भीती अनेक कलाकारांच्या मनात आहेत, असे क्रांती या पत्रकार परिषदेत म्हणाली होती.तिच्या या पत्रकार परिषदेनंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार क्रांतीला पाठींबा देत पुढे आले आहेत. अभिनेत्री मेघा धाडे हिने क्रांतीला पाठींबा दिला. आता मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर (Aaroh Welankar) यानेही क्रांतीला पाठींबा जाहीर केला आहे.

‘क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीतील अनेक मित्र तुला पाठींबा देण्यासाठी उघडपणे व्यक्त होत नाहीयेत. सोशल मीडियावरून सुरू असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम खरंच अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे की आपण खूप चांगले मित्र नाही आहोत, पण तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे,’ असं ट्वीट आरोहने केलं आहे. काय म्हणाली होती क्रांती?समीर वानखेडे केवळ देशसेवा करत आहेत. पण त्यांची प्रतीमा मलिन करण्याचे हे सर्व प्रयत्न आहेत.  जे काही होतंय ते दु:खद आहे. त्यांना काही सिद्ध करायचं असेल तर ते केसशी निगडीत असलं पाहिजे, वैयक्तिक आयुष्याशी नाही. जे काही त्यांना सांगायचं असेल ते न्यायालयासमोर सांगावं. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. जर कोणी चुकीचं करत असेल तर त्याला जेलमध्येही पाठवता येऊ शकतं. परंतु हे सर्व सोशल मीडियावर का सुरू आहे. ही कोणती पीआर एजन्सी आहे, कोणी त्याना हायर केलंय, जे आम्हाला धमकी देत आहे, खुलेपणानं ट्रोल करत आहेत. जेव्हा तुम्ही ते तपासून पाहता तेव्हा ते खरे फॉलोअर्स नाहीयेत हे दिसून येतं. त्यांच्या शून्य फॉलोअर्स आहेत आणि शून्य ट्वीट्स आहेत. ते सर्व फेक अकाऊंट्स असून घाबरवण्यासाठी हे केलं जात आहे, असं क्रांती म्हणाली होती. 

टॅग्स :आरोह वेलणकरक्रांती रेडकरसमीर वानखेडेआर्यन खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी