आर्या आंबेकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिका आहे. आपल्या सुमधूर आवाजाने आर्या प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आर्याचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. अनेकदा आर्या समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत तिचं मत व्यक्त करताना दिसते. आतादेखील आर्याने पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली आहे.
आर्याने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने गेल्या काही दिवसांत समाजात घडलेल्या घटनांचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे. तसंच या स्वातंत्र्यदिनी तिने चाहत्यांना एक आवाहनही केलं आहे.
आर्या आंबेकरची पोस्ट
खूपच चिंताजनक बातम्या वाचनात येत आहेत. पुण्यातील अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण किंवा एका कुटुंबाचे धरणात वाहून जाणे.
या घटनांमधील एक सामान्य धागा असा वाटतो की लोकांनी घाबरणं सोडूनच दिलंय. किंवा लोक भिती व्यक्त करायला reluctant आहेत, याची चिंता वाटते.
आजकाल भिती आणि anxiety यासारख्या मूलभूत मानवी भावना सुद्धा चुकीच्या प्रकारे दाखवल्या जात आहेत. (जीवनात आवश्यक असणाऱ्या प्रमाणातल्या भीती व anxiety याबद्दल बोलते आहे).
याचा परिणाम म्हणून लोक भिती दाखवायलाच तयार नाहीत. कदाचित वाढती अनियंत्रित वर्तनं ह्याचाच परिणाम असेल का?
असं वाटतं शाळांमध्ये एनसीसी सारखे discipline चे आणि मनोविज्ञान शिक्षणाचे, थेरपीचे धडे समाविष्ट करणं आवश्यक झालं आहे.
या स्वातंत्र्यदिनी, आपल्याला एकमेकांना असमर्थता व्यक्त करण्याची मुभा देऊया आणि असमर्थतेला निर्बंधांशिवाय स्वीकारूया.
आर्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अगदी मोजक्या शब्दांत आर्याने या पोस्टमधून महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.