अभिनेता अशीम गुलाटीने ‘तुम बिन-2’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘स्टार प्लस’वरील ‘दिल संभल जा जरा’ या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आता पहिल्यांदाच ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ मालिकेत प्रेक्षकांना तो एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आगामी पौराणिक मालिकेत तो कर्णाची भूमिका साकारत असल्याने या मालिकेत काम करण्यासाठी तो खूप उत्सुक आहे.
अशीम गुलाटीने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असल्याने त्याचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी तो सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. कर्णाच्या भूमिकेसाठी त्याला तयार होण्यासाठी तब्बल दीड तास लागतात. या भूमिकेसाठी तो त्याच्या अंगावर सूर्यकवच चढवितो. हे सूर्यकवच सिलिकॉनपासून बनविलं जातं आणि ते दररोज नव्याने बनवावं लागतं. ते तयार करण्यासाठी निदान 45 मिनिटे लागतात. ते झाल्यावर मगच त्याला वेशभूषा आणि रंगभूषा करता येते. तो परिधान करत असलेले कपडे आणि दागिने यांचे वजन तर खूपच जास्त आहे. या भूमिकेविषयी तो सांगतो, “एक धनुर्धारी आणि योद्धा ही कर्णाची बाजू आपल्या सर्वांना परिचित आहे. पण आता प्रथमच त्याची एक प्रियकराची बाजू प्रेक्षकांसमोर येणार आहे. पण ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्यापुढील एक आव्हान आहे. मला हिंदीत अस्खलितपणे बोलता येत नाही. या मालिकेतील काही संवाद संस्कृत किंवा उर्दू भाषेतील असल्याने त्यांचा उच्चार योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे. त्यामुळेच हिंदी शब्द समजण्यासाठी आणि त्यांचे उच्चार योग्य तऱ्हेने करण्यासाठी मी आता रोज हिंदी वृत्तपत्रं वाचण्यास प्रारंभ केला आहे.”
‘कर्णसंगिनी’ या मालिकेत आजवर अज्ञात असलेल्या सूर्यपुत्र कर्ण आणि त्याची संगिनी (प्रेयसी) राजकन्या उरुवी यांच्यातील प्रेमकथेचे चित्रण करण्यात आले आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ही एक आगळी प्रेमकथा आहे. ही मालिका कविता काणे यांची प्रसिद्ध कादंबरी कर्णाज वाईफः द आऊटकास्ट क्वीन वर बेतलेली आहे. किंशुक वैद्य या मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारणार आहे.