Join us

'आशिकी' फेम अभिनेते राहुल रॉय यांच्या तब्येतीत सुधारणा, आयसीयूमधून शिफ्ट केले जनरल वॉर्डमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 16:38 IST

अभिनेते राहुल रॉय यांना काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता.

'आशिकी' फेम अभिनेते राहुल रॉय यांना काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी त्यांचा प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. आता त्यांना आयसीयूमधून जनरल रुममध्ये हलविण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी राहुल रॉय यांच्या स्पीच आणि फिजिकल थेरेपीला सुरुवात केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल रॉय यांची मेहुणी रोमीर यांनी सांगितले की, 'आता ते धोक्यातून बाहेर आले आहेत आणि त्यांना काल अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.'

गेल्या काही दिवसांपासून राहुल रॉय एल ए सी- लाइव्ह द बॅटल चित्रपटाचे कारगिलमध्ये शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुल रॉय यांच्यासोबत काम करणारा अभिनेता निशांत मलकानी म्हणाला की, 'हे सर्व गेल्या मंगळवारी घडले. ते सोमवारी रात्री झोपताना ठीक होते. त्यांना वातावरणामुळे हा त्रास झाला असेल, असे मला वाटते. जिथे आम्ही शूटिंग करत होतो, तिथले तापमान मायनस १५ डिग्री सेंटीग्रेड होते.'

एल ए सी- लाइव्ह द बॅटल या चित्रपटात निशांत मलकानी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कुमार गुप्ता यांनी केले असून चित्रा वकिल शर्मा आणि निवेदिता बासु यांनी निर्मिती केली आहे.

टॅग्स :राहुल रॉय