मराठी चित्रपट हा कायमच नवनवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या नाविन्यपूर्ण संकल्पना कधी कथेशी, कधी दिग्दर्शनाशी, कधी छायाचित्रणाशी, तर कधी चित्रपटातल्या नायक नायिकांशी संबंधित असतात. नाविन्याचा ध्यास घेतलेल्या मराठी चित्रपटाच्या परंपरेला अनुसरून ‘आसूड’ हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवीन जोडी पडद्यावर झळकणार आहे.
‘सत्या – 2’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘बॉईज २’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा अमित्रीयान पाटील पुन्हा एकदा ‘आसूड’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याने शिवाजी पाटील नावाच्या शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित मुलाची भूमिका साकारली आहे तर ‘मिस इंडिया टुरिझम अॅवॉर्ड’ विजेती रश्मी राजपूत ही अभिनेत्री ‘आसूड’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करीत आहे. मीनल साळवे नावाच्या पत्रकार मुलीची भूमिका तिने या चित्रपटात साकारली आहे. ‘पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. एकमेकांच्या भूमिका आणि त्या भूमिकांची गरज ओळखत आम्ही काम केल्यामुळे आम्ही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो’ अशा भावना अमित्रीयान आणि रश्मीने व्यक्त केल्या.
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा शिवाजी पाटील आणि त्याच्या चळवळीला पाठींबा देत त्याला भक्कम साथ देणारी, पेशाने पत्रकार असलेली मीनल साळवे यांची अनोखी कथा ‘आसूड’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.