Join us

'तुला पाहते रे' मालिकेतील मायरा दिसणार 'सूर सपाटा'मध्ये 'या' वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 8:00 AM

'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय.'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात तिचीही महत्त्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे'सूर सपाटा' २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे 'सूर सपाटा'मध्ये अभिज्ञा एका ध्येयवेड्या कबड्डीपट्टू मुलाच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे

अभिज्ञा भावे... मालिका जगतातील एक चमचमता तारा. अभिनय कौशल्याच्या जोरावर कुठल्याही भूमिकेला न्याय मिळवून देणारा हा चेहेरा अलीकडे घराघरांत अगदी रोजच पाहायला मिळतोय. 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. भूमिका कुठलीही असो आपल्या खास अशा टचने ती प्रत्येक भूमिका आपलीशी करते हे तिचं वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. अशाच एका चॅलेंजिंग भूमिकेतून ती आपल्यासमोर येणार असून 'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात तिचीही महत्त्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

'देवयानी', 'लगोरी', 'खुलता कळी खुलेना', 'कट्टी-बट्टी', 'तुला पाहते रे' यांसारख्या मालिकेतून आपली छाप पाडणारी अभिज्ञा नेहमीच हटक्या भूमिकेत आपल्याला दिसत आलेली आहे पण 'सूर सपाटा'मधील भूमिका काहीशी वेगळी आहे. स्त्री ही प्रत्येक घराची सपोर्ट सिस्टीम असते. मग ती आजी, आई, बायको, बहीण कुठल्याही स्वरूपात असो. संपूर्ण कुटुंब जिच्या कवेत गुण्यागोविंदानं नांदतं अशी समर्थ भूमिका अभिज्ञाच्या वाट्याला या चित्रपटाच्या निमित्ताने आली आहे. 'सूर सपाटा'मध्ये अभिज्ञा एका ध्येयवेड्या कबड्डीपट्टू मुलाच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय पटवर्धनच्या म्हणजेच 'सूर सपाटा'मधील 'पुरण'च्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेतील अभिज्ञा कधी प्रेमळ... प्रसंगी कठोर... तर कधी भावाच्या पंखांना बळ देणाऱ्या खंबीर भूमिकेत विशेष कष्ट घेताना दिसतेय. नेहमीप्रमाणेच या सुद्धा भूमिकेला प्रेक्षक नक्कीच पसंतीची पावती देतील अशी अभिज्ञाला आशा आहे.

आपल्या मातीतला खेळ 'कबड्डी'वर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या चित्रपट क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगलेली असून अनेक दर्जेदार चित्रपटांतून लोकप्रियतेच्या कळसावर आरूढ होणार राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पहायला मिळतील. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंत या चित्रपटात एकाचवेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ह्या गुलदस्त्यातील काही पत्ते आत्तापर्यंत उलगडण्यात आले असून उपेंद्र लिमये आणि संजय जाधव यांची नावे उघड करण्यात आली आहेत तर आत्ता पुढील नावांमध्ये कुठले कलावंत असणार या प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. 

किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा'ची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफी विजय मिश्रा यांची असून अभिनय जगताप चे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावेसूर सपाटातुला पाहते रे