एका मराठी नाट्यसंस्थेची ‘अभिजात’ ५१ वर्षे...! उत्तम कलाकृती देणारी संस्था म्हणून खास ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 02:14 AM2020-10-13T02:14:10+5:302020-10-13T06:55:35+5:30

‘अभिजात’ने पूर्ण केले ५१ वर्षे, नाट्यनिर्माते अनंत काणे यांनी १३ ऑक्टोबर १९६९ रोजी या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या बहुतांश नाटकांचे लेखक शं. ना. नवरे होते; तर नंदकुमार रावते हे या नाटकांचे दिग्दर्शक होते.

'Abhijat' of a Marathi Natya Sanstha for 51 years ...! Special recognition as an organization that provides excellent artwork | एका मराठी नाट्यसंस्थेची ‘अभिजात’ ५१ वर्षे...! उत्तम कलाकृती देणारी संस्था म्हणून खास ओळख

एका मराठी नाट्यसंस्थेची ‘अभिजात’ ५१ वर्षे...! उत्तम कलाकृती देणारी संस्था म्हणून खास ओळख

googlenewsNext

राज चिंचणकर 

मुंबई : ‘गुंतता हृदय हे’, ‘गहिरे रंग’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सूर राहू दे’, ‘वर्षाव’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘गुलाम’, ‘सुरुंग’ या आणि अशा अनेक उत्तम नाट्यकृती देणारी संस्था म्हणून ‘अभिजात’ या नाट्यसंस्थेची मराठी नाट्यसृष्टीत ओळख आहे. निर्माते अनंत काणे यांनी या संस्थेद्वारे रसिकप्रिय अशी नाटके रंगभूमीवर आणली आणि रसिकजनांनीसुद्धा या नाटकांना उदंड प्रतिसाद दिला. हीच ‘अभिजात’ नाट्यसंस्था १३ आॅक्टोबर रोजी ५१ वर्षे पूर्ण करत आहे.

नाट्यनिर्माते अनंत काणे यांनी १३ ऑक्टोबर १९६९ रोजी या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या बहुतांश नाटकांचे लेखक शं. ना. नवरे होते; तर नंदकुमार रावते हे या नाटकांचे दिग्दर्शक होते. ‘अभिजात’च्या सुरुवातीपासूनच सर्व नाटकांचे नेपथ्य व प्रकाशयोजनेची धुरा बाबा पार्सेकर यांनी सांभाळली होती. ‘अभिजात’ या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून अनेक आघाडीच्या रंगकर्मींनी भूमिका साकारल्या. डॉ. काशिनाथ घाणेकर, श्रीकांत मोघे, सतीश दुभाषी, राजा मयेकर, आत्माराम भेंडे, बबन प्रभू, शंकर घाणेकर, रमेश देव, कमलाकर सोनटक्के, रवींद्र मंकणी, राजा बापट, अशोक पाटोळे, आशा काळे, सुहास जोशी, पद्मा चव्हाण, आशालता, नीना कुलकर्णी, लता अरुण, भावना, रजनी जोशी या व अशा अनेक कलाकारांनी ‘अभिजात’ची नाटके गाजवली.

विशेष म्हणजे, ‘अभिजात’चा वर्धापन दिनही दरवर्षी उत्साहात साजरा होत असे आणि या सोहळ्यात पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर, छोटा गंधर्व, अजय पोहनकर, शोभा गुर्टू, परवीन सुलताना अशा नामवंत गायकांची उपस्थिती असे. २००१ मध्ये निर्माते अनंत काणे यांचे निधन झाले आणि या संस्थेवर पडदा पडला. मात्र नाट्यरसिकांच्या मनात ‘अभिजात’च्या नाट्यकृतींनी प्राप्त केलेले स्थान मात्र अढळ आहे. मागच्या पिढीतील रसिकांनी आजही या नाटकांच्या स्मृती जपल्या आहेत. दरम्यान, या नाट्यसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्याची इच्छा अनंत काणे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली असल्याची माहिती ‘अभिजात’चे माजी व्यवस्थापक दीपक सावंत यांनी दिली आहे.

एकच प्रयोग ‘दिवसेंदिवस’
‘अभिजात’च्या एका वर्धापनदिनी नाटककार शं. ना. नवरे यांच्या ‘दिवसेंदिवस’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. आशा काळे व अशोक पाटोळे या प्रमुख कलावंतांसह यात ५० कलाकारांचा सहभाग होता. महत्त्वाचे म्हणजे, ‘दिवसेंदिवस’ या नाटकाचा झालेला हा एकमेव प्रयोग ठरला.

Web Title: 'Abhijat' of a Marathi Natya Sanstha for 51 years ...! Special recognition as an organization that provides excellent artwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.