'तुझेच मी गीत गात आहे' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिजीत खांडकेकर, तेजस्विनी लोणारी, उर्मिला कोठारे अशी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेने अडीच वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केल्यानंतर अखेर निरोप घेतला आहे. या मालिकेतील स्वरा आणि मल्हार ही बापलेकीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिजीत खांडकेकर मल्हारच्या भूमिकेत होता. तर बालकलाकार अवनी तायवाडे हिने स्वराची भूमिका साकारली होती.
आता मालिका संपल्यानंतर अभिजीत भावुक झाला आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेसाठी अभिजीतने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिजीतने मालिकेतील कलाकारांबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अभिजीत खांडकेकरची पोस्ट
अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय….
प्रत्येक मालिकेच्या निमित्ताने कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं. त्यांच्याबरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एके दिवशी आता उद्याचा कॉलटाइम येणार नाही. “ ए तू किती वाजता उद्या?”, “आज डब्यात तुझ्यासाठी खास आणतेय हा..”, “ च्यायला ट्राफिक लागला यार आज खूप” , “चलो चलो जल्दी घर जाना है…” हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही.
आता हा चॅप्टर संपवून नविन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायलाच वेळ लागतो…पण आम्हा कलाकारांचं हे असंच असतं. तरीही तुझेचच्या निमित्ताने तयार झालेले हे बंध आयुष्यभरासाठी आहेत. अवनी तायवडे, अवनी जोशी म्हणजेच स्वरा आणि पिहू ने मला बापपणाचा अनुभव दिला. कांचन गुप्तेने आईसारखी माया दिली. सचिन, उमेश, शैलेश, हार्दिक, विघ्नेश, केदार, प्रथमेश, सागर, अभिजीत च्या रूपात भाऊ मिळाले. पल्लवीसारखी आदर्श वहिनी, बहीण मिळाली. प्रिया , तेजस्विनी, उर्मिलासारख्या आयुष्यभराच्या मैत्रिणी...प्रत्येकाबद्दल भरपूर लिहिता येईल … पण ते लिहीण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल…
सतिश राजवाडे सर, अजिंक्य , मधूरा , महिपाल जी, अभिजीत गुरू, वर्षा, उत्तरा, सुवर्णा ताई , संपूर्ण ट्रम्पकार्ड टीम आणि स्टार प्रवाह टीमचे मनापासून आभार 🙏🏻 रसिक प्रेक्षकांना दंडवत...तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही.
‘तुझेच मी गीत गात आहे'च्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने प्रसारीत होतोय याहून अनोखा योगायोग अजून कुठला. पुन्हा नव्या भुमिकेतून आपल्या समोर येत राहीनच. असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.
'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा शेवटचा भाग रविवारी(१६ जून) प्रसारित करण्यात आला. चांगली मालिका संपल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. पण, मालिकेचा शेवट गोड केल्याने प्रेक्षक आनंदी होते.