Join us

मराठमोळ्या तरूणाने सातासमुद्रापार रोवला झेंडा, अभिजीत मारूती पवारच्या लघुपटाची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 19:54 IST

अभिजीत मारुती पवार दिग्दर्शित 'द नोशन ऑफ आईस' या लघुपटाने तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे.

अभिजीत मारुती पवार दिग्दर्शित 'द नोशन ऑफ आईस' या लघुपटाने तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. एक नाही दोन नाही तर बऱ्याच देशांच्या महोत्सवात या लघुपटाने विजेतेपद पटकावले. भारताकडून निवडलेल्या आणि विजेतेपद मिळवलेला हा लघुपट भारतीय सिनेमा फॅन्ससाठी आनंदाची बातमीच आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून 'पोर्ट ब्लेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१' चे विजेतेपद म्हणून या लघुपटाने किताब पटकावला. तर 'वर्ल्ड फिल्मकार्निव्हल सिंगापूर २०२१' चा आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवार्ड 'द नोशन ऑफ आईस' या लघुपटाला घोषित झाला. 

याशिवाय 'ड्रूक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल भूतान २०२१' आणि 'इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१' चे विजेतेपदही या लघुपटाला मिळाले. याशिवाय बेस्ट इंडियन लघुपट म्हणून 'गोल्डन स्पॅरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१' आणि आऊटस्टँडिंग फिल्म म्हणून 'टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१' चा मान या लघुपटाने पटकावला.

या लघुपटाची भाषा इंग्रजीमध्ये असून अभिजीत मारुती पवार याने हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाच्या निर्मितीची धुरा 'स्क्रीन स्टोरी २४ प्रोडक्शन' या प्रोडक्शन हाऊसने पेलली आहे. तर लघुपटाची कथा रोहित एस लिखित आहे. या लघुपटातून देवेश शर्मा, मानसी पाटील, धारा चांदोरकर, भावना कासू, समीर शेख इत्यादी कलाकारांनी आपल्या अभिनयाची कलाकृती मांडली.

या लघुपटाबाबत दिग्दर्शक अभिजीत मारुती पवार म्हणाले की, "या लघुपटाची कथा मला माझ्या बंगळुरूच्या रोहित या मित्राकडून मिळाली, स्क्रिप्ट वाचताच मी खूप प्रभावित झालो आणि स्क्रिप्ट वाचता वाचताच माझ्या डोक्यात कल्पनाशक्ती निर्माण होत गेली. बऱ्याच लोकांनी मला हा लघुपट करणं फार कठीण आहे असे सुचवले मात्र माझ्या स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर मी हा लघुपट करण्याचे धाडस केले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत कोरोनाकाळात हा लघुपट चित्रित करण्यात आला आणि याचे फळ म्हणून आज हा लघुपट आंतरराष्ट्रीय पुरस्कारात विजेतेपद पटकावत आहे. मी माझ्या संपूर्ण टीमलाही धन्यवाद देऊ इच्छितो की आज त्यांच्यामुळे हे यश संपादन करता आले".

टॅग्स :शॉर्ट फिल्म