काही वर्षांपासून आशय-विषयाच्या वेगळेपणामुळे मराठी सिनेमा सातत्याने गाजतो आहे. मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. कलात्मक तरीही व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करणारी दिग्दर्शकांची नवीन फळी मराठी चित्रपटसृष्टीत आश्वासकपणे कार्यरत आहे. याच फळीतलं एक नाव म्हणजे अभिजित पानसे. मनोरंजनाला कलात्मकतेची जोड देऊन दर्जेदार सिनेमा करण्याचं शिवधनुष्य पेलत अभिजित पानसे ‘उळागड्डी’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन येत आहेत. ‘रेगे’ चित्रपटाच्या यशानंतर अभिजित पानसे यांच्या या दुसऱ्या चित्रपटाची खासियत काय असणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच राज ठाकरे यांच्या हस्ते दादासाहेब फाळके चित्रनगरीत झाला. या वेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांसह चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता महेश मांजरेकर, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अभिनेता जयवंत वाडकर आवर्जून उपस्थित होते.‘दशावतारम्’, ‘रामलीला’, ‘बर्फी’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे कॅमेरामन रवी वर्मन, कलादिग्दर्शिका सलोनी धात्रक आणि व्हिजुअल इफेक्ट व टेक्निकल दिग्दर्शक प्रसाद सुतार यांचा समावेश आहे. शिल्पा राऊत, संदीप राऊत व अभिजित पानसे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा शिवराज वायचळ यांची असून, संवाद शिवराज वायचळ व अभिजित पानसे यांचे आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप आहेत. भाषेच्या मर्यादा ओलांडून केवळ कलासंपन्नतेकरिता ही दिग्गज मंडळी एकत्र आली आहेत.
अभिजित पानसेचा ‘रेगे’नंतर ‘उळागड्डी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2015 2:55 AM