बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या ‘घूमर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एका हातामुळे अपंगत्व आलेल्या महिला क्रिकेटपटूच्या संघर्षावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनबरोबरबॉलिवूड अभिनेत्री संयमी खेर मुख्य भूमिकेत आहे. तर अभिषेकने प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. १८ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
सनी देओलचा 'गदर २' आणि अक्षय कुमारच्या 'ओएमजी २'(OMG 2) या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. गदर २ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करायला सुरुवात केली होती. सनी देओलच्या या चित्रपटाचा अभिषेक बच्चनच्या घूमरला फटका बसल्याचं चित्र आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत घूमर सिनेमा प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात अपयशी ठरत आहे.
घूमर चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ ८५ लाखांची कमाई केली. तर दुसऱ्य दिवशी या चित्रपटाने १.१० कोटींचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी अभिषेक बच्चनच्या घूमरने बॉक्स ऑफिसवर १.५२ कोटींची कमाई केली. तर चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट दिसून आली. सोमवारी या चित्रपटाने केवळ ७२ लाखांचा गल्ला जमवला. घूमर चित्रपटाने चार दिवसांत फक्त ४.१९ कोटींची कमाई केली आहे.
घूमर चित्रपटाची कथा अपंगत्व आलेल्या अनिनी या महिला क्रिकेटरच्या संघर्षाभोवती फिरते. भारतीय महिला क्रिकेट संघात तिचं सिलेक्शन झालेलं असतानाच अपघातात तिला एक हात गमावावा लागतो. यानंतर पदम सिंह सोढी या प्रशिक्षकाच्या मदतीने ती या सगळ्याला कशाप्रकारे सामोरं जाते, याचा प्रवास या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे.