ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - हॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील सिनेमांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पादुकोणनं दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित तसेच प्रदर्शनापूर्वी वादग्रस्त ठरलेला आगामी "पद्मावती" सिनेमासाठी तब्बल 12 कोटींपर्यंत मानधन घेतल्याची चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या ""गोलियों की रासलीला रामलीला"" आणि "" बाजीराव मस्तानी"" सिनेमानंतर दीपिका पुन्हा एकदा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प ""पद्मावती"" सिनेमात दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ""रामलीला"" सिनेमासाठी दीपिकाला एक कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. या सिनेमाच्या दोन वर्षांनंतर आलेल्या ""बाजीराव मस्तानी""सिनेमासाठी तिला 7 कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले होते. आता दीपिकाला आगामी सिनेमा ""पद्मावती""साठी 12 कोटी रुपये मानधन ऑफर करण्यात आलेत. यानिमित्तानं 10 कोटी रुपयांचा आकडा पार करणारी पहिली अभिनेत्री होण्याचा मान दीपिका पादुकोणनं मिळवला आहे.
आणखी बातम्या वाचा
महागडी अभिनेत्री दीपिका पादुकोण
तर दुसरीकडे जगातील महागड्या अभिनेत्रींमध्येही दीपिकाच्या नावाची नोंद झाली आहे. ऑगस्ट 2016मध्ये ‘फोर्ब्स’ मासिकाने दिलेल्या यादीमध्ये जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोण दहाव्या स्थानावर होती.
संजय लीला भन्साळींच्या ""पद्मावती""ची चर्चा
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा पद्मावती रिलीजपूर्वीच बराच चर्चेत आहे. राजस्थानमध्ये सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान भन्साळींना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. राजपूत समाजाशी संबंधित करणी सेना या संघटनेने हा हल्ला केला. पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंहवर काही दृश्यं चित्रित करण्यात येत होती. ही दृश्यं चुकीची असल्याचं सांगत करणी सेनेने त्याचा निषेध करत हल्ला केला. त्यामुळे ज्या पद्मावतीमुळे भन्साळींना मारहाण करण्यात आली ती राणी पद्मावती नेमकी कोण होती? आणि काय होती तिची कथा? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
कोण होती राणी पद्मावती-
राणी पद्मावती चित्तोडची स्वाभिमानी राणी होती. सौंदर्याची खाण असलेल्या पद्मावतीच्याच्या शौर्याची आणि बलिदानाची कथा इतिहासात अमर आहे. सिंहल द्वीपचे राजा गंधर्व सेन आणि राणी चंपावतीची मुलगी पद्मावतीचं लग्न चित्तोड़चे राजा रतनसिंह यांच्यासोबत झालं. राणी पद्मावती दिसण्यास अत्यंत सुंदर आणि मनमोहक होती त्यामुळेच एक दिवस दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीची वाईट नजर तिच्यावर पडली.
राणी पद्मावतीला मिळवण्यासाठी खिलजीने चित्तोडवर आक्रमण केलं. पण चित्तोड किल्ल्याच्या सात मजली तटबंदीने खिलजी हैराण झाला. पण त्याने किल्ल्याला वेढा दिला होता. त्यानंतर त्याने वेगळी चाल खेळत आपण किल्ल्याचा वेढा काढू पण एकदा केवळ पद्मावतीचे मुखदर्शन व्हावे असा खलिता पाठविला. यावर रतनसिंह यांनी सहमती दर्शवली. मात्र, एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अट तिने घातली.
त्यानंतर पद्मावतीचं निखळ सौदर्य पाहून खिलजी घायाळ झाला. दगा-फटका करत त्याने राजा रतन सिंहला कैद केलं आणि जोपर्यंत पद्मावती आपल्याला शरण येत नाही, तोवर राजाला सोडणार नाही, अशी धमकी दिली.
त्यावर पद्मावतीनेही चाल खेळली आणि शरण येण्याची तयारी दाखवली पण एक अट ठेवली. ती म्हणजे 700 दासी सोबत घेऊन येण्याची अट . खिलजी तयार झाला.
दुस-या दिवशी पालख्या येताना पाहून खिलजी खूष झाला. यापैकी एका पालखीत पद्मावती असणार असं त्याला वाटलं. पद्मावतीने 700 दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या लढवय्या सैनिकांची भर्ती केली होती, योग्य वेळ साधत सैनिकांनी खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली.
हा अपमान खिलजीला सहन झाला नाही. तो चवताळला आणि घमासान युद्धाला सुरूवात झाली. या लढाईत चित्तोडचे अनेक सैनिक मारले गेले आणि सोबतच राजा रतनसिंह यांचाही मृत्यू झाला. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला.
युद्धात हार झाल्याचं ऐकून राणी पद्मावतीने किल्ल्याच्या आतमध्ये एक मोठी चिता जाळण्यास सांगितलं. खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी तिने चितेत उडीत घेण्याचा निर्णय़ घेतला. स्त्रियांना बंदी बनवण्यास खिलजीने किल्ल्यात प्रवेश करताच राणी पद्मावती यांच्यासह जवळपास 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात.