ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. २५ - लुधियानातील एका क्लबमधील कार्यक्रमासाठी गेलेल्या प्रख्यात गायिका अलका याज्ञिक यांचा एका व्यक्तीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अलका याज्ञिक १० ऑक्टोबर रोजी लुधियानातील सतलुज क्लबमध्ये गेली असता तेथील एका अधिका-याने त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अलका यांच्या मॅनेजरने सतलुज क्लबच्या अध्यक्षांना मेलद्वारे या घटनेची माहिती देत तक्रार नोंदवली आहे.
सतलुज क्लबमध्ये अलका यांचा कार्यक्रम होता, त्यापूर्वी त्या ग्रीन रूममध्ये तयार होत असतानाच क्लबचा अधिकारी तेथे आला व अलका यांना फोटो काढण्यासाठी आग्रह करू लागला. मात्र अलका यांनी त्या अधिका-याला नकार देताच त्याने त्यांच्याशी गैरवर्तन केले.
याप्रकरणी अलका यांच्या मॅनेजरने तक्रार नोंदवली असून क्लबने त्या अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.