Join us

"...आणि भलत्याच हॉटेलमध्ये गेलो", अशी झाली स्वप्निल जोशीची फजिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 6:06 AM

स्वप्नील जोशी, अभिनेतामी आणि माझ्या काही मित्रांनी एकदा हॉटेलमध्ये जाण्याचा बेत आखला होता. माझी पत्नी लीना आणि काही ...

स्वप्नील जोशी, अभिनेतामी आणि माझ्या काही मित्रांनी एकदा हॉटेलमध्ये जाण्याचा बेत आखला होता. माझी पत्नी लीना आणि काही कॉमन मित्र-मैत्रिणींचा आमचा ग्रुप होता. कधी जायचं, किती वाजता पोहोचायचं वगैरे सर्व ठरलं. मला आठवतंय मी त्यावेळी नरिमन पॉइंटला शूटिंग करत होतो. त्यामुळे मी सगळ्यांना म्हटलं की, तुम्ही हॉटेलला पोहोचा आणि मी येतो. आम्ही सर्व आपापल्या मार्गाने हॉटेलमध्ये पोहोचलो. ते सर्व पोहोचले तसाच मीही पोहोचलो.

फोन कॉलवर माझा इंटरव्ह्यू सुरू असल्याने मी हॉटेलच्या बाहेरच उभा होतो. 'पोहोचलात का... मी पोहोचलो... आत बसा मी येतो...' वगैरे माझं सुरू होतं. 'तुम्ही अमुक ऑर्डर करा', असं मी सांगितलं. माझा फोन सुरू असल्याने १० मिनिटे द्या, असं सांगितलं. सर्वांनी ऑर्डर दिली. १५-२० मिनिटांनी कॉल संपल्यावर मी हॉटेलमध्ये गेलो. आत आमच्या ग्रुपमधील मला कोणीच दिसलं नाही. मी त्यांना कॉल केला आणि विचारलं, 'कुठे आहात?' ते म्हणाले, 'अरे इकडे ये ना डावीकडे... मॅझनीन फ्लोअर आहे. तिकडे...' मी सगळं हॉटेल धुंडाळलं, पण मला कोणीच दिसलं नाही. मी विचारलं, 'तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये आहात?'

ते म्हणाले, 'ठाण्याला...' ते ठाण्याला होते आणि मी पोहोचलो होतो बांद्र्यातील हॉटेलमध्ये... त्या हॉटेलच्या बांद्र्यातआणि ठाण्यात अशा दोन शाखा आहेत. मी बांद्र्याला पोहोचलो होतो. बांद्र्याहून मी ठाण्याला पोहोचेपर्यंत खूप उशीर होणार होता. त्यांची जेवणाची ऑर्डरही आली होती. त्यानंतर फोनवर गप्पा मारत माझा सर्व ग्रुप ठाण्यातील हॉटेलमध्ये जेवला माझ्याशिवाय... आणि मी एकटा एका टेबलवर बसून बांद्र्यातील हॉटेलमध्ये जेवलो. तिथली लोकंही माझ्याकडे आश्चर्यानं बघत होती. अरे हा तर नट आहे... खरं तर हा लोकांच्या गराड्यात असायला हवा.., असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यानंतर आम्ही पूर्ण जेवण फोनवर गप्पा मारत केलं. व्हिडीओ कॉल ऑन होता आणि आम्ही गप्पा मारत होतो. सर्वांनी माझी इतकी टर उडवली की विचारू नका... त्या दिवशी अचानक न ठरवता अर्धा-एक तास मला एकटं बसायला मिळालं.

मी शांतपणे एकटा जेवलो. हॉटेलमधील स्टाफ चांगला होता. त्यांनी मला डिस्टर्ब केलं नाही. खरं तर माझी फजिती झाली होती, पण त्यातूनही एक वेगळा अनुभव मला घेता आला. मला मजा आली. ते माझ्या कायम स्मरणात राहील. त्यानंतर पुढचे काही महिने मी कुठे जायचं म्हटलं की माझे मित्र चिडवायचे, 'बांद्र्याला की ठाण्याला...?' आमच्या ग्रुपमधील तो एक अलिखित जोक झाला होता. अरे स्वप्नीलला कुठे यायचं ते सांगा हां, तो वेगळ्या ठिकाणी जातो... असं मला सर्व जण चिडवायचे. 

टॅग्स :स्वप्निल जोशी