अबोली कुलकर्णी
टीव्ही जगतात अभिनेत्री सना सय्यद या गोड आणि गॉर्जिअस चेहऱ्याची एंट्री होताच तिला स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेची ऑफर आली. ‘जाना ना दिल से दूर’ आणि ‘पापा बाय चान्स’ या दोन हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता ती या नव्या शोमध्ये दृष्टीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘चाहत्यांचे प्रेम हेच आमच्यासाठी कौतुकाची थाप,’ असे सना सय्यद हिने मुलाखतीदरम्यान सांगितले. या मालिकेनिमित्ताने तिच्याशी केलेली ही हितगुज...
* स्टार प्लस वाहिनीवर सुरू झालेल्या ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत तू दृष्टी शर्मा हिच्या भूमिकेत दिसत आहेस. काय सांगशील कशी आहे तुझी भूमिका?- दिव्य दृष्टी हा शो खूपच वेगळा असून माझी भूमिकाही तितकीच नवी आहे. दृष्टीजवळ अशी एक शक्ती असते जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटेल. ती भविष्य बघू शकत असते. त्याशिवाय दृष्टी ही एक अत्यंत साधी, समंजस मुलगी आहे. ती कधीही तिच्याकडे असलेल्या शक्तीचा गैरवापर करत नाही. ती कायम दुसऱ्यांसाठीच त्या शक्तीचा वापर करते. ती तिच्या बहिणींवर खूप प्रेम करते आणि रक्षीतसोबत असलेले तिचे नाते ती तिच्या बहिणींच्या आयुष्यासाठी संपवते.
* तुला जेव्हा एखाद्या प्रोजेक्टची ऑफर मिळते तेव्हा तू कोणत्या बाबींना प्राधान्य देतेस?- माझ्यासाठी शोची थीम आणि माझी भूमिका हे सर्वांत महत्त्वाचे आहे. मला या शोची कन्सेप्ट खूप आवडली कारण या शोची कन्सेप्ट खूपच वेगळी आहे. दृष्टीची भूमिका खूप उत्सुकता वाढवणारी आहे. ती जरी खूप साधी मुलगी असली तरी पण काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर ती नक्कीच त्यांच्याविरोधात आवाज उठवते. तिच्या भूमिकेला खूप कंगोरे आहेत. भविष्य पाहता येण्याची शक्ती असलेली युवतीची भूमिका कुणाला करायला आवडणार नाही?
* या शोपूर्वी तू ‘जाना ना दिल से दूर’ आणि ‘पापा बाय चान्स’ या दोन शोमध्ये काम केलेले आहे. किती वेगळी आहे दृष्टीची भूमिका? - मी प्रशिक्षीत कलाकार आहे. प्रत्येक भूमिका ही वेगळी आणि आव्हानात्मक आहे. पापा बाय चान्स यामध्ये माझी भूमिका एका दिल्लीच्या युवतीचे होते खूपच बबली आणि बडबडी अशी ती होती. तिच्यापेक्षा दृष्टीची भूमिका वेगळी आहे. दिव्य दृष्टीची भूमिका अत्यंत वेगळी असून मी आत्तापर्यंत अशी भूमिका कधीही केलेली नाही. यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची कल्पना करावी लागते, त्यामुळे ते अजूनच आव्हानात्मक होते. प्रत्येक शो वेगवेगळे चॅलेंजेस घेऊन येत असतो. मी एक चांगली कलाकार बनण्यासाठी आव्हानांचा सामना करत असते.
* तू अभिनय क्षेत्राला करिअर म्हणून का निवडलेस?- मी आत्तापर्यंत एका बिनधास्त मुलीचे आयुष्य जगले आहे. मला करिअर म्हणून काय करायचे आहे हे काहीच माहित नव्हते. पण मी मार्केटिंगमध्ये काम करत होते. तिथे मला एक अभिनयाची संधी मिळाली आणि तेव्हापासून मी आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही. जसजशा संधी मिळत गेल्या तसतशी मी अभिनयाकडे वळत गेली. पण आता अभिनय हेच माझे पॅशन आहे.
* तू इन्स्टाग्रामवर बरीच अॅक्टिव्ह आहेस. कसं वाटतं जेव्हा चाहत्यांकडून असं प्रेम मिळतं तेव्हा? - आम्ही कलाकार हे चाहत्यांच्या प्रेमासाठी आसुसलेलो असतो. आज आम्ही जे कोणी आहोत हे त्यांच्यामुळेच आहोत, याची आम्हाला जाणीव असते. जेव्हा ते एवढं भरभरून प्रेम करतात तेव्हा आम्ही पुन्हा प्रोत्साहित होऊन झपाट्याने कामाला सुरूवात करतो.