कोलकाता - लोकप्रिय बंगाली अभिनेता अभिषेक चटर्जी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 58 वर्षांचे होते. अभिषेक यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात माहिती दिली. बुधवारी एका शुटींगदरम्यान त्यांनी पोटात दु:खत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर, प्रिंस अनवर शाहर रोडवरील त्यांच्या निवासस्थानीच त्यांना सलाईन लावण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.
अभिषेक चॅटर्जी यांनी 1986 मध्ये पथभोला या चित्रपटातून बंगली चित्रपटसृष्टीत डेब्यू केला होता. त्यानंतर, ऋुतूपर्णो घोष यांच्या दहन आणि बारीवाली तसेच मजूमदार यांच्या आलोसमेत अनेक हिट चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती. बंगाली मालिकांमध्येही त्यांनी तगडं काम केलंय. त्यामुळे, बंगालच्या घराघरात त्यांचा चेहरा पोहोचला होता. चॅटर्जी यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
आपले युवा अभिनेता अभिषेक चटर्जी यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. अभिषेक हे प्रतिभाशाली आणि बहुमुखी होते, आपल्याला त्यांची कायम आठवण राहिल. टिव्ही माध्यम आणि बंगाली चित्रपटसृष्टीचं हे मोठं नुकसान आहे. त्यांचे कुटुंब आणि मित्रांप्रती मी संवेदना व्यक्त करते, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
‘सुजानसखी’, ‘लाठी’, ‘संख सिंदुरर डिब्बी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांची सहस्टार असलेली अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ताने शोक व्यक्त केला. तसेच, अभिषेक यांनी व्यावसायिक चित्रपटांत नवीन मापदंड निर्माण केला, ते लोकांच्या काळजात घर करत होते, असे ऋतुपर्णाने म्हटले आहे.