Join us

'खिशात पैसे नव्हते म्हणून लंगरमध्ये जेवायचो'; 'फर्जंद'फेम अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 09:52 IST

Actor: एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्याने एकेकाळी लंगरमध्ये जाऊन पोट भरल्याचं सांगितलं.

आयुष्यात संघर्ष कोणालाच चुकलेला नाही. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष केला आहे. यामध्येच मराठी कलाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्याने एकेकाळी लंगरमध्ये जाऊन पोट भरल्याचं सांगितलं. एका मुलाखतीमध्ये तो बोलत होता.

'फर्जंद' सिनेमातीलअंकित मोहन साऱ्यांनाच ठावूक आहे. दिल्लीतील चांदनी चौकमध्ये लहानाचा मोठा झालेल्या अंकितने २००६ मध्ये रोडिजमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई गाठली. परंतु, या नव्या शहरात ओळख निर्माण करणं त्याच्यासमोर फार मोठं आव्हान होतं. याविषयी त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं. २००६ मध्ये मी मुंबईत पहिल्यांदा आलो. त्यावेळी मी रोडिजमध्ये सहभागी झालो होतो. त्या काळात माझ्याकडे राहायला घर नसल्यामुळे मी एका बॅगेत माझं सामान आणलं होतं. ती बॅग घेऊनच सगळीकडे फिरायचो. बरेचदा राहायला नीट जागा नसायची. खिशात पैसे नसायचे त्यामुळे मी गुरुद्वारामध्ये जाऊन लंगर खाऊन पोट भरायचो. बऱ्याचदा उपाशीपोटीही काम केलं आहे, असं अंकित म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "एका खोलीमध्ये आम्ही ७-८ जण रहायचो. सगळे जण आपआपल्या कामात बिझी असायचे. त्यावेळी माझ्या अकाऊंटमध्ये मोजकेच पैसे होते. हातात काम नव्हतं. कोणी गॉडफादर नव्हता. २० रुपयांचं तिकीट काढून त्याच तिकीटावर दिवसभर फिरायचो. बऱ्याचदा ऑडिशनमध्ये यश मिळत नव्हतं. या शहराने मला प्रत्येक गोष्ट शिकवली. पण, मी कधी हार मानली नाही. मुंबईत आल्यानंतर ३-४ वर्षांनंतर मला चांगलं काम मिळालं. पहिला चेक मिळाल्यावर मी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा माझ्या आई-वडिलांसाठी मी एसी खरेदी केला होता. पण, या सगळ्यातून मी शिकत गेलो आणि आज या ठिकाणी पोहोचलो आहे."

दरम्यान, अंकित मोहन हा फर्जंद या सिनेमात झळकला होता. त्याने या सिनेमात कोंडाजी ही भूमिका साकारली होती. या सिनेमातील त्याची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर आता तो लवकरच  रामशेज आणि मुरारबाजी या सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :अंकित मोहनसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन