गेल्या दोन महिन्यात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एखादा नाट्यमय प्रवास असावा अशा या घडामोडी होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर या राजकीय वातावरणाची बरीच चर्चा रंगली. या चर्चांमध्येच 'मी पुन्हा येईन' (me punha yein) ही नवीन बेवसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर साऱ्यांनी त्याचा संबंध राज्याच्या राजकारणाशी जोडला होता. मात्र, प्रत्यक्षात तसं नसून ही सीरिज निव्वळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असल्याचं स्पष्ट झालं. सध्या सोशल मीडियावर अभिनेता भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) याची एक पोस्ट चर्चेत येत आहे. या पोस्टमध्ये त्याने दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
'मी पुन्हा येईन' या बहुचर्चित ठरलेल्या सीरिजमध्ये भारत गणेशपुरे याने सम्राट वाकडे ही भूमिका साकारली असून भारतने या सीरिजचं जोरदार प्रमोशन केल्याचं पाहायला मिळालं. अलिकडेच त्याने या सीरिजसंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहून अनेकांच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या.
'मी पुन्हा येईन' या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत असताना "अरे आम्ही स्वत:हून आलो, मले आणायची गरज नाही पडली" ! 'मी पुन्हा येईन' २९ जुलैपासून फक्त ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर !", असं कॅप्शन त्याने दिलं. हे कॅप्शन पाहून अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, प्लॅनेट मराठी निर्मित, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘ मी पुन्हा येईन’ वेबसीरिजचे एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाले आहेत. या सीरिजमध्ये सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॅार्ट पॅालिटिक्स पाहायला मिळत आहे. या सीरिजमध्ये भारत गणेशपुरेसह सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.