अभिनेता चिन्मय मांडलेकर (chinmay mandalekar) याच नाव आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मानाने घेतलं जातं. उत्तम अभिनय, लेखन यांच्या जोरावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्याने आतापर्यंत विविध मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटातही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच चिन्मय मांडलेकर याने सोशल मीडियावर सक्रिय न राहण्यामागचं कारण सांगितलं.
चिन्मयने नुकतंच 'अजब गजब' या पॉडकास्टला मुलाखत दिली. सोशल मीडियावर सक्रिय का नाही, या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, 'मी सोशल मीडियावर नाही म्हणून मला काम मिळतं. माझं पूर्वी फेसबूक अकाउंट होतं. पण, आयुष्यात मला ट्विटर (एक्स) जमलं नाही. कारण मला ती खूप मोठी गटार गंगा वाटते. त्यामुळे मी त्या वाटेला जात नाही. इन्स्टाग्रामवर माझं आता एक अकाउंट आहे. कारण आपण जी काम करतो, चित्रपट म्हणा, मालिका म्हणा किंवा नाटक म्हणा ते प्रमोट करावं लागतं. त्यासंबंधित पोस्टर शेअर कराव्या लागतात'.
चिन्मय म्हणाला, 'आता आपलं काय चाललंय हे जगाला कळावं त्याला म्हणतात सोशल मीडिया. माझी इच्छा नाहीये, माझं काय चाललंय हे जगाला कळावं. मी कुठं जातोय? मी काय करतोय? मी कुठे जेवलो? मी कुठे गेलो? मी काय खाल्लं? माझ्या कुटुंबातील सदस्य काय करतात? हे जगाला कळावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे सोशल मीडियापासून दूर असतो'.
पुढे चिन्मय म्हणाला, 'दुसरं मला हळूहळू जाणवू लागलं. विशेष म्हणजे लॉकडाऊननंतर की, आपल्याला लोकांबद्दल खूप अनावश्यक माहिती कळतं राहते. एवढंच नव्हे सोशल मीडियावरच्या भांडणामुळे मी लोकांच्या भल्याभल्या मैत्र्या तुटताना बघितल्या आहेत. राजकीय भांडण वैगरे. माझे इतके मित्र आहेत आणि ते इतक्या भिन्नभिन्न राजकीय विचारसरणीचे आहेत. तरीही ते माझे मित्र आहेत. इतक्या वर्षांचा काळ, दंगली, निवडणूका, या सगळ्या गोष्टी आमची मैत्री तोडू शकली नाही. तर सोशल मीडियामुळे ती तुटू नये म्हणून मी सोशल मीडियापासून लांब आहे आणि ते बरं आहे'.
तो म्हणाला, 'मला सोशल मीडिया जास्त वापरत नाही. पण, मी अशा अनेक लोकांना ओळखतो जे सोशल मीडियावर सक्रीय आहेत, म्हणून त्यांना काम मिळाली आहेत. त्यांचं उत्पन्न्ही चांगलं आहे. माझे असे अनेक मित्र आहेत, ज्यांनी मला सांगितलं की त्यांचं घर लॉकडाऊनमध्ये फक्त सोशल मीडियामुळे चाललं. सध्या तरी मी जास्त वापरत नाही. सोशल मीडियावर आपल्या वैयक्तीक गोष्टींचा खुलासा होतो. मला ते घातक आहे असं वाटतं, जेव्हा गरज वाटले तेव्हा ते मी वापरेलचं'.