ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - "बिग बॉस" फेम अभिनेता एजाज खान याने आपल्या राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा केला आहे. भाजपा सरकार अंमलीपदार्थ बाळगण्याच्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप एजाजने केला आहे. याबाबत फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड करून एजाजने खळबळ उडवून दिली आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
बुधवारी रात्री एजाजने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली. ""मी आता शूटींगसाठी बाहेर आहे. घरी माझी बायको आणि मुलगा दोघेच आहेत, आणि आता माझ्या घरी 10 ते 12 पोलिस पोहोचले, तुमच्या घराची झडती घ्यायची आहे कारण तुमच्या घरात अंमलीपदार्थ आहेत असं ते म्हणाले, त्यांच्याकडे कोणतंही वॉरंट नसताना त्यांनी घराची झडती घेतली. आता हे लोकं माझ्या घरात अंमलीपदार्थ ठेवून मला अडकवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या चाहत्यांना विनंती करतो की माझ्या घराखाली जमा व्हा, तुम्हाला माहितीये माझं घर कुठे आहे. दाखवून द्या त्यांना मी एकटा नसून तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात. वा... बीजेपी सरकार...वा"" असं तो या व्हिडीओत बोलत आहे.
काय आहे प्रकरण?
एजाज खानने काही दिवसांपूर्वी गोहत्येसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने चामड्याचा पट्टा बनवणा-या हार्ले डेव्हिडसन कंपनीवर कारवाईची मागणी केली होती. कारण हार्ले डेव्हिडसन गायीच्या चामड्याचा वापर करते त्यामुळे आधी त्यांच्यावर बंदी घाला अशी मागणी त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन केली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. त्याच्या या व्हिडीओला प्रत्युत्तर म्हणून मनोज दुबे नावाच्या एका व्यक्तीने एक वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला होता. त्याला उत्तर देताना एजाजनेही एक व्हिडीओ नव्याने अपलोड केला होता. या दोघांमधील वाद सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.