मुंबई - सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानं बॉलिवूडला धक्का बसला आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी कौशिक यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या अचानक एक्झिटने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. एक दिवसापूर्वीच होळीच्या जल्लोषात बुडालेल्या लोकांनी पुढील सकाळ इतकी भयानक असेल याची कल्पनाही केली नसावी कारण जे होतं ते टाळता येत नाही.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूची वार्ता कुटुंबाला, चाहत्यांना आणि बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना धक्कादायक आहे. अनेकांना दिग्गज अभिनेता आज आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणेही कठीण जात आहे. सतीश कौशिक यांनी मुंबईत येऊन अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत वेगळी छाप पाडली. मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. १९७२ मध्ये दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतले. त्यानंतर एफटीआयआयमधून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले.
'मासूम' सिनेमातून अभिनयाला सुरुवात खूप कमी लोकांना माहिती आहे की, सतीश कौशिक यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर रूप की रानी, चोरों का राजा या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले. सिनेमात कॉमेडी करूनही त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.
२ महिन्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर १६ वर्षांनी बनले वडील सतीश कौशिक यांचे लग्न १९८५ मध्ये शशि कौशिक यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. परंतु कौशिक यांच्या आयुष्यात मोठा अपघात घडला ज्यामुळे ते पूर्णपणे खचले होते. १९९६ मध्ये त्यांच्या २ वर्षीय मुलाचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूनंतर सतीश कौशिक मानसिकदृष्ट्या हादरले होते. ज्यातून बाहेर पडायला त्यांना खूप काळ लागला.
सतीश कौशिक यांच्या आयुष्यात पुन्हा १६ वर्षांनी आनंद आला. मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल १६ वर्षांनी २०१२ मध्ये त्यांच्या घरी लहान मुलाचा आवाज ऐकू आला. सरोगेसीच्या माध्यमातून कौशिक यांच्या घरी मुलीने जन्म घेतला. मुलीच्या जन्मानंतर घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले.