मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. केवळ मराठीच नाही तर त्याने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. गश्मीरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. गश्मीर सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं.
नुकत्याच घेतलेल्या ‘Ask Gash’ या सेशनमध्ये गश्मीरला 'सर तुम्ही बोलता जबरदस्त, राजकारणात प्रवेश करा. एक अभ्यासपूर्ण नेता मिळेल, तुमचं काय मत आहे यावर', असं चाहत्याने विचारलं होतं. चाहत्याच्या या प्रश्नाला गश्मीरने अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. तो म्हणाला, 'आत्ता तरी नाही, मला बोलायचे आहे ते माझ्या चित्रपटातून आणि मुलाखतीतून बोलीन, पुढचं पुढे बघू'. यानंतर आणखी एका चाहत्याने त्याला 'तुला राजकारण आवडतं का?' असं विचारल्यावर गश्मीर म्हणाला, 'राजकारण रंजक आहे, मला राजकारण पाहण्याची आणि त्याबद्दल वाचण्याची सवय आहे. मी अनेक ठिकाणी जातो आणि गोष्टी एक्सप्लोर करतो'.
गश्मीरने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक चित्रपटात गश्मीर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दुहेरी भूमिकेत होता. गश्मीरने 'देऊळ बंद', 'धर्मवीर', 'कॅरी ऑन मराठा', 'बोनस' या सिनेमांत काम केलं आहे. 'ईमली', 'तेरे इश्क मे घायल' या हिंदी मालिकांमध्येही गश्मीर झळकला. त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हेदेखील ज्येष्ठ अभिनेते होते. मराठी कलाविश्वातील देखणा हिरो अशी त्यांची ओळख होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांचा दु:खद अंत झाला. तर नुकतेच दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्याचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित केलं. 'चौथा अंक' असं या पुस्तकाचं नाव असून या आत्मचरित्रात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातले काही चांगले -वाईट अनुभव शेअर केले आहेत. गश्मीर आपल्या आईने लिहिलेल्या पुस्तकाबद्दल म्हणाला की, 'तिच्या आयुष्यात जे अनुभवलंय तेच या पुस्तकात आत्मचरित्राच्या रूपाने मांडलं आहे'.