मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. अशातच अभिनेते किरण मानेंनी खास पोस्ट लिहिलीय, " प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर, चित्ताकर्षक पुतळा आहे, त्याला येत्या नोव्हेंबर मध्ये सदुसष्ट वर्ष पूर्ण होतील... गेली सात दशकं तब्बल एकशेवीसच्या वेगाने येणारे वारे झेलत हा पुतळा आजही दिमाखात उभा आहे ! या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं भारताचे अत्यंत बुद्धीमान, संवेदनशील, मानवतावादी, देखणे, रुबाबदार पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी !"किरण माने पुढे लिहितात, "झालं असं की, फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना सतत एका गोष्टीची खंत होती की छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या प्रतापगडावर शिवरायांचं स्मारक नाही ! त्यांनी ही खंत त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवली. यशवंतरावांना हे मनोमन पटलं. तातडीने हालचाली करून राजभवनात मिटींग घेऊन प्लॅन ठरला. पं. नेहरूंचीही तात्काळ मान्यता मिळाली. त्यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ते नव्हते. प्रचंड मेहनत घेऊन, अनेक अडचणींवर मात करून, तब्बल दोन वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक उभं राहिलं. पंडितजी स्वत: या उद्घाटनाला आले."
"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:58 PM