झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) गेल्या कित्येक वर्षांपासून रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या शोमधील विनोदवीर आपल्या विनोदशैलीनं रसिकांना खळखळून हसायला भाग पाडतात.यातील विनोदवीर भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, निलेश साबळे, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके घराघरात पोहचले आहेत. आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मनं जिंकणारा कुशल बद्रिके (Kushal Badrike) त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत येत असतो.
कुशलच्या प्रत्येक पोस्टला नेटकरी भरभरुन प्रतिसाद देत असतात. नुकतीच त्यानं केलेली पोस्ट ही आयुष्यातील एक कटू सत्य सांगून गेली आहे पण लाखमोलाची गोष्ट त्यामाध्यमातून कुशल बोलून गेला आहे.
कुशलनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''Struggle काळातल्या ट्रेनच्या प्रवासात, कधीकधी चुकून डुलकी लागायची, थोड्यावेळाने डोळे उघडले की आजूबाजूला वेगळीच माणसं दिसायची, खिडकीतून बाहेर डोकावलं तर वेगळेच रस्ते, वेगळ्याच बिल्डिंग्स, आणि मग लक्षात यायचं, की सालं आपण उतरायचं ”स्टेशन” तर मागेच राहून गेलं !''
''मग पुढल्या एखाद्या अनोळखी स्टेशनला उतरायचं, अनोळखी पाट्या, अनोळखी स्टॉल्स, अनोळखी माणसं. पण इंडिकेटर वरची “रिटर्न ट्रेन” मिळेपर्यंत, सगळं ओळखीचं होऊन जायचं. आयुष्याचा प्रवासही थोड्याफार फरकाने असाच असतो, नाही का? आपण थांबायचं ठिकाण चुकलं की मग एका अनोळखी जगाचा प्रवास सुरू होतो….फक्त आयुष्याच्या प्रवासात कोणत्याच इंडिकेटरला रिटर्न ट्रेन नसते. आपलं उतरायचं स्टेशन आणि माणसं एकदा चुकली, की चुकली…''