अभिनेते प्रकाश राज कायम त्यांच्या परखड भूमिकांमुळे चर्चेत असतात. प्रकाश राज अनेकदा आसपासच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर त्यांंची मतं व्यक्त करत असतात. प्रकाश राज याआधी अनेकदा पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका करताना दिसले. अशातच प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमात पुन्हा एकदा मोदी आणि भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की, "ज्यांनी ४२० म्हणजेच लोकांची फसवणूक केली आहे. तीच माणसं आगामी निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याची गोष्ट करत आहेत. कोणतीही पार्टी असो कॉंग्रेस किंवा अन्य काही. अशी गोष्ट करणं म्हणजे तुम्ही किती अहंकारी आहात हे दर्शवता. लोकशाहीत कोणतीही पार्टी ४०० हून अधिक जागा जिंकेल याची काहीच शक्यता नाही."
प्रकाश राज पुढे म्हणतात, "तुम्ही एखादी जागा तेव्हाच जिंकता जेव्हा जनता तुम्हाला ती जागा निवडून देते. आम्ही सर्व जागा जिंकू, असा दावा कोणतीही पार्टी करु शकत नाही. कारण असं म्हटल्यास त्यांचा अहंकार स्पष्ट दिसतो." या शब्दात भाजप सरकारवर प्रकाश राज यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. दरम्यान काल अभिनेत्री स्वरा भास्करनेही 'दबातंत्राचं सरकार' म्हणत भाजपावर टीका केली.