७० ते ९०चं दशक अभिनय कौशल्याच्या जोरावर गाजवलेले दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajanai) यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी (१४ जुलै) संध्याकाळी पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी पावणेसहा वाजता रवींद्र महाजन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. यावेळी पत्नी, मुलगा गश्मीर आणि सून उपस्थित होते.
अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी रवींद्र महाजनींच्या पत्नी, सून, मुलगा गश्मीर महाजनी, मुलगी वैष्णवी महाजनी उपस्थित होते. तसेच मेघराज राजे भोसले, भाग्यश्री देसाई, प्रविण तरडे, मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे, किरण यज्ञोपावित, रमेश परदेशी आदी उपस्थित होते.
रवींद्र महाजनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. गेल्या काही महिन्यांपासून रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले.
नाटकातून केले होते अभिनयात पदार्पण
‘जाणता अजाणता’ या नाटकातून रवींद्र महाजनी यांनी अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. त्यानंतर १९७४ साली झुंज या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केली. ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तसेच ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले. १९९० नंतर चरित्र भूमिका, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनात प्रवेश केला. २०१५ नंतर रवींद्र महाजनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' अशा काही चित्रपटांत झळकले.