Join us

अभिनेत्री रेखा यांचा वाढदिवस.

By admin | Published: October 10, 2016 11:05 AM

खूबसूरत, खून भरी मांग, उमराव जान, घर अशा एकाहून एक सरस चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका निभावणारी ग्रेसफूल अभिनेत्री रेखा हिचा आज (१० ऑक्टोबर) वाढदिवस

संजीव वेलणकर
पुणे, दि. १० -  खूबसूरत, खून भरी मांग, उमराव जान, घर अशा एकाहून एक सरस चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका निभावणारी ग्रेसफूल अभिनेत्री रेखा हिचा आज (१० ऑक्टोबर) वाढदिवस.
 
दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते मा.जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेली रेखा या गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळ बॉलीवूडमध्ये असून त्या अगदी सुरुवातीपासूनच आश्वासक अभिनेत्री म्हणून ओळखली गेली आहे. रेखा यांचे मूळ नाव भानुरेखा पण सिनेसृष्टी साठी त्यांनी रेखा हे नाव धारण केले. १९७० मध्ये आलेला सावन भादो हा त्यांचा पहिलाच चित्रपट अगदी लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर नमक हराम, धर्मा, कहानी किस्मत की आणि प्राण जाए पर वचन ना जाए यासारखे कित्येक हीट चित्रपट त्यांनी दिले. दो अंजाने या चित्रपटात त्यांनी महत्वाकांक्षेसाठी आपल्या प्रेमाची तिलांजली देणाऱ्या पत्नीची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना वेगळा आनंद देऊन गेली. गुलजार यांच्या घर मध्ये एक प्रगल्भ रेखा पाहायला मिळाली. त्यानंतर त्या भारतीय प्रेक्षकांचे मन जिंकत गेली आणि शेवटी बॉक्स ऑफिस क्वीन म्हणूनच ओळखली जाऊ लागल्या. मुकद्दर का सिकंदर, खुबसुरत, जुदाई, माँग भरो सजना, एक ही भूल यासारखे त्यांचे चित्रपट हीट ठरले होते. यश चोप्रा यांचा सिलसिला आणि मुजफ्फर अल यांचा उमराव जानने त्यांचे आगळ्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केले रेखा यांनी भारतीय चित्रपट इतिहासाला सुवर्णक्षणांचे संचित बनवले आहे. त्यांनी फटाकडी या मराठी सिनेमात सुद्धा काम केले आहे. मा.रेखा या  आपल्या फिगर आणि फिटनेस साठी नावाजली जातात. त्या भारताची फार लोकप्रिय ग्लॅमर आयकॉन ठरली आहे. त्यांना अस्सल ‘मेकओव्हर क्वीन’ म्हणूनच ओळखले गेले. ४० वर्षात त्यांचे  १८० हून जादा सिनेमे आले. रेखा यांना ५ फिल्म फेअर व पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. त्या खासदार पण आहेत.  तिच्या चाहत्यासाठी रेखा अजून तेवढीच 'खुबसुरत' आहे. १९७३ मध्ये रेखा यांनी विनोद मेहराशी गुपचूप केलेलं लग्न दोघांनी नाकारलं, पण ९०-९१ मध्ये मुकेश अगरवालशी केलेलं  लग्न अवघे १४ महिन्यात संपले. लोकमत समूहाकडून मा.रेखा यांना शुभेच्छा 
 
संदर्भ:-इंटरनेट