Join us

शूटिंगची वेळ गाठण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतील कलाकारांनी केला लोकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 18:09 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. १०० भागांचा हा प्रवास प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. पुढील भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खडतर प्रवास पाहायला मिळणार आहे.

मुंबई लोकल म्हणजे तमाम मुंबईकरांची जीवनवाहिनी. लाखो प्रवासी रोज लोकलने प्रवास करतात. मुंबईची शान असणाऱ्या या लोकल प्रवासाचा सुखद आनंद नुकताच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतील कलाकारांनी घेतला. १०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेल्या या मालिकेत बाबासाहेबांच्या विदेश दौऱ्याचे भाग पाहायला मिळत आहेत. विदेश दौऱ्यामधील कोलंबिया विद्यापीठाचा प्रसंगही दाखवण्यात आला. या विशेष भागाचं चित्रीकरण चर्चगेट येथील डेव्हिड ससून लायब्ररीमध्ये करण्यात आलं. या भागाच्या शूटिंगसाठी जेव्हा मालिकेची टीम गोरेगावहून निघाली तेव्हा रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडी पाहून सर्वांनीच लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. शूटिंगला वेळेत पोहोचणं महत्त्वाचं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा सागर देशमुख मालिकेचे दिग्दर्शक गणेश रासने यांच्यासोबत संपूर्ण टीमने गोरेगाव ते चर्चगेट लोकलने प्रवास केला. प्रवासातल्या वेळेचा सदुपयोग करत सागर देशमुखने दिग्दर्शकासोबत सीनचं वाचनही केलं. 

लोकल प्रवासाच्या अनुभवाविषयी सांगताना सागर म्हणाला, ‘लोकलचा हा प्रवास माझ्या कायम स्मरणात राहणार आहे. ट्रेनमध्ये सीनचं वाचन करताना सहप्रवासी आमच्याकडे कुतुहलाने पहात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेविषयी असणारं प्रेम त्यांनी व्यक्त केलं शुभेच्छाही दिल्या. मात्र या प्रवासात कोणीही त्रास दिला नाही ही कौतुकाची बाब आहे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. १०० भागांचा हा प्रवास प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. पुढील भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खडतर प्रवास पाहायला मिळणार आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच बाबासाहेबांनी वडिलांचं छत्र गमावलं आणि आता त्यांचा मोठा भाऊ म्हणजेच आनंदाही या जगाचा निरोप घेणार आहे. जवळच्या माणसांना गमावलेल्या बाबासाहेबांच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा काळ मालिकेत पाहायला मिळणार आहे. या कठीण प्रसंगातही खचून न जाता उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या बाबासाहेबांची जिद्द खरंच कौतुकास्पद म्हणावी लागेल. 

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरबाबासाहेब धाबेकरसागर देशमुखलोकल