Join us

अन् प्रसिद्ध गुलकंद कुल्फी खाल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 8:59 AM

एकदा मात्र इतका सुंदर अनुभव आला की आज लिहावंसं वाटलं. चाळीसगावला गेलो होतो. एका डॉक्टर दांपत्याच्या घरी मुक्काम होता. मला न्यायला ते आले होते. 

संजय मोने (अभिनेते)

काही वर्षांपूर्वी मी ‘संजय उवाच’ नावाचा एक एकपात्री कार्यक्रम करायचो. सुमारे शंभरच्यावर प्रयोग केले. कारण एकच होतं, भरपूर फिरायला मिळेल. शिवाय बरीचशी महाराष्ट्र मंडळं आहेत. त्यांना नेहमीप्रमाणे स्वस्तात कार्यक्रम हवे असतात. एकटा माणूस असला की ते साधतं. मात्र तिथे पोचल्यावर कुणाच्या घरी राहणार नाही हे स्पष्टच सांगायचो. कारण कसं काय एवढे संवाद लक्षात ठेवता इथून ते लोक प्रश्न विचारून हैराण करतात. कार्यक्रमाच्या पैशात हेही येतं असं त्यांना वाटतं.

एकदा मात्र इतका सुंदर अनुभव आला की आज लिहावंसं वाटलं. चाळीसगावला गेलो होतो. एका डॉक्टर दांपत्याच्या घरी मुक्काम होता. मला न्यायला ते आले होते. 

जुजबी प्रश्न विचारत असताना त्यांचं घर आलं. चहापाणी झाल्यावर संध्याकाळपर्यंत आराम करायला एक खोली त्यांनी दाखवली. जाताना दुपारच्या जेवणाची साधारण वेळ विचारून घेतली. त्या वेळेला एक नोकर आला आणि इथेच जेवणार की खाली सगळ्यांबरोबर असं विचारलं. मी माझ्या खोलीत जेवण मागवलं. वांग्याचं भरीत. दाण्याची चटणी घातलेलं. पातळ भाकऱ्या, कोशिंबीर, आमटी खास खान्देशी पद्धतीची. गोड काही हवं आहे का? असं चक्क विचारलं, उगाच घ्या ना घ्या ना असा आग्रह नाही. मी नकार दिला. संध्याकाळी माझा कार्यक्रम संपला. लगेचच परतीची गाडी होती. दोघं मला सोडायला आले. स्टेशनवर लवकर आलो.

‘उगाच गर्दी नको म्हणून आधीच आलोय.’ प्रतीक्षालयात कोणीही नव्हतं. मग त्या दोघांनी थोड्या गप्पा मारायला सुरुवात केली. कॉलेजात असताना दोघंही उत्तम अभिनय करायचे. भरपूर पुरस्कार मिळालेले. स्वतःची एक हौशी संस्था होती. पण त्यात कधीच अभिनय केला नाही.

‘डॉक्टर व्हायचं ठरवलं तेव्हाच अभिनय करायचा नाही हेही नक्की केलं होतं’ ‘ती एक नशा आहे. आणि आपल्या असलेल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्याची ताकद त्यात आहे.’ ‘म्हणून कायम इतरांना संधी मिळावी हाच हेतू ठेवला. आजही सकाळी तुम्ही आमच्याबरोबर जेवायला आला नाहीत म्हणून अजिबात रागबिग आला नाही. कायम गर्दीत असता, कधीतरीच एकांत मिळतो, तो तुम्हाला उपभोगायला मिळावा असं वाटलं. उगाच खोटं खोटं हसून आम्हाला हो ला हो करून निरर्थक गप्पा मारत थंडगार जेवण्यात काय मजा आहे?’ 

मला फार आवडायला लागली ती दोघं. ‘मी तुमच्याकडे प्रथेप्रमाणे गोड खाल्लं नाही, सहसा खातही नाही. पण आत्ता खावंसं वाटतंय.’ ‘ वा! मस्त! इथेच स्टेशनच्या बाहेर कुल्फी मिळते.’ बाहेर येऊन तिथली प्रसिद्ध गुलकंद कुल्फी खाल्ली. एक नाही दोन. तितक्यात गाडी आल्याची सूचना झाली. तृप्त मनाने आणि पोटाने गाडीत बसलो. हलकेच डोळा लागला. काही वेळाने जाग आली. चक्क दादर स्टेशन. मजा आली चाळीसगावात.

टॅग्स :संजय मोनेचाळीसगावटेलिव्हिजन