मराठी कलाविश्वातील ऑल राऊंडर अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). उत्तम अभिनयशैली अललेला हा अभिनेता, मालिका, नाटक, रिअॅलिटी शो, कविता, लेखन असं बरंच काही एकावेळी करत असतो. विशेष म्हणजे तो प्रत्येक गोष्टीला समान न्याय देतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगत असते. परंतु, संकर्षण केवळ अभिनयातच नव्हे तर गाडी चालवण्यातही तितकाच सरस आहे. अलिकडेच त्याने बस चालवून सगळ्यांना थक्क केलं आहे. याविषयी अभिनेता प्रशांत दामले यांनी पोस्ट शेअर केली आहे.
सध्या संकर्षण, प्रशांत दामले यांच्यासोबत नियम व अटी लागू या नव्या नाटकाचे प्रयोग करत आहे. अलिकडेच या नाटकाचा कोथरुडमध्ये प्रयोग पार पडला. हा प्रयोग झाल्यानंतर संकर्षणने पुणे-मुंबई हा प्रवास स्वत: बस चालवून केला. संकर्षणने बस चालवण्यामागेही एक खास कारण आहे. हे कारण प्रशांत दामले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
काय आहे प्रशांत दामले यांची पोस्ट?
"काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत", अशी पोस्ट प्रशांत दामले यांनी लिहिली आहे.
दरम्यान, गौरी थिएटर निर्मितव प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'नियम व अटी लागू' या नाटकाचा प्रयोग कोथरुडला पार पडला. या प्रयोगानंतर पुन्हा मुंबईला येत असताना त्यांच्या बस चालकाची तब्येत बिघडली. त्यामुळे नाटकाच्या टीमने तेथेच थांबायचा निर्णय घेतला. मात्र, संकर्षणने बस चालकाला आराम करायला सांगून स्वत: बसचं स्टेअरिंग हातात घेतलं. विशेष म्हणजे त्याचं हे धाडस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.