कलाविश्वातील दोन दिग्गज कलाकार म्हणजे संतोष जुवेकर (santosh juvekar) आणि दुसरा मनोज वाजपेयी (manoj bajpayee). दोन्ही कलाकारांनी कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. एकीकडे संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटांसह मालिका, वेबसीरिजमध्ये काम केलंय. तर, मनोज वाजपेयी यांनी हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे दोन्ही कलाकार आज त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यांच्यात तुंबळ हाणामारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही प्रचंड मारामारी करत असून एकही जण माघार घेत नसल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काय झालं? कशामुळे हा वाद सुरु आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, हा व्हिडीओ संतोषने स्वत: शेअर करुन या मारामारीच्या मागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ खुद्द संतोष जुवेकरनेच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कलाकार हाणामारी करताना दिसत असले तरीदेखील ही भांडणं खरी नाहीत. तर, हा एका चित्रपटातील सीन आहे. 'भोसले' या हिंदी सिनेमामध्ये संतोष आणि मनोज या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. हा चित्रपट मराठी माणूस आणि हिंदी भाषिक यांच्यात झालेल्या वादावर आधारित आहे. त्यातील हा सीन आहे.“माझी आणि मनोज बाजपेयीचं भांडण अक्षरशः हाणामारीपर्यंत आलं आणि पुढे जे घडलं ते सांगतो तुम्हाला. पुरावा म्हणून हा video post करतोय”, असं कॅप्शन देत संतोषने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमालीच्या कमेंट केल्या आहेत. अलिकडेच संतोषचा ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.