अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला, प्रकृतीबाबत दिली अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:02 AM2023-03-14T11:02:29+5:302023-03-14T14:43:55+5:30
अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला
Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण करत असताना ही घटना घडली. त्यांना त्वरित गाडीत बसवण्यात आले. दरम्यान त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसून ते सुखरुप आहेत. त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे आज सकाळीच पुणे बंगळुरु महामार्गावर रुंदीकरण सुरु असलेल्या ठिकाणी पोहोचले होते. झाडे वाचवण्यासाठी तासवडे येथे ते स्वत: हजर होते. झाडं तोडून त्यांची छाटणी करुन त्यांचं पुनर्रोपण केलं जावं अशी भूमिका त्यांनी घेतली. तळबीड येथून तुटणारी काही झाडे वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, वाचण्यासारखी झाडे वहागाव येथे प्लॅट करण्यात येणार आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले. यासाठीच ते तिथे पोहोचले होचे. दरम्यान याचवेळी त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला. त्यांना लगेच गाडीत बसवण्यात आलं.
आता सयाजी शिंदे यांची प्रकृती ठीक आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, 'मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. आता काळजीचं काही कारण नाही, मला दोन-तीन माश्या चावल्या असून कानाभोवती थोडी सूज आली आहे. मात्र आता आम्ही सुखरूप आहोत. चिंतेचं काहीच कारण नाही. या महामार्गावर वृक्षतोड सुरू आहे. या परिसरात सुमारे २०० वर्षांहून अधिक जुनी झाडे आहेत. त्यांची तोड केली जात आहे. ही झाडे तोडून त्यानंतर दोन-चार झाडे लावली जातात. परंतु त्याचा योग्यपद्धतीने पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे आताच पुढाकार घेऊन ही झाडे वाचवण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही इथं काम करत आहोत.'
सयाजी शिंदे नेहमीच पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कार्यरत असतात. झाडं वाचवण्यासाठी तर ते कायमच प्रयत्नशील असतात. गावागावात वृक्षारोपण करत ते जनजागृती करतात तर जिथे पर्यावरणाची हानी होते तिथे ते त्वरित आवाजही उठवताना दिसतात.