Sharad Ponkshe : "हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले..."; शरद पोंक्षेंच्या 'त्या' ट्विटची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 12:54 PM2022-06-25T12:54:40+5:302022-06-25T12:59:53+5:30
Sharad Ponkshe And Eknath Shinde : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या एका पोस्टची तुफान चर्चा रंगली आहे. शरद पोंक्षे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
मुंबई - शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. याच दरम्यान अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या एका पोस्टची तुफान चर्चा रंगली आहे. शरद पोंक्षे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील ते आपली मतं सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता ही त्यांनी "मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले" असं म्हणत एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट केली आहे. पोंक्षे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये "कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे मा. शिंदेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने ऊभे राहीले" असे कॅप्शन लिहित शरद पोंक्षे यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे.
कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे मा.शिंदेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने ऊभे राहीले. pic.twitter.com/6o8MlCMgTd
— SHARAD PONKSHE (@ponkshes) June 24, 2022
ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये "हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं... सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले" असं लिहिलं आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'दुसरं वादळ' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. यानिमित्ताने त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.