Join us

सारांश: पाय थरथरायला लागले, बोबडी वळली, अंधारी आली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 8:11 AM

अशी झाली फजिती...

- शिवाजी साटम, अभिनेता

पडदा पडण्यापूर्वी माझं शेवटचं वाक्य होतं, ‘मेरे जनाजे पे सारा जहाॅं निकला, मगर वो न निकले जिनके लिये मेरा जनाजा निकला...’ मी डायलॉग म्हटला खरा, पण त्यावेळी ती रंगभूमीवरची माझी जणू जनाजा निघाल्यासारखी वाटली. त्यावेळी बुवांसारखा ग्रेट कलाकार पाठीशी उभा राहिला नसता तर मी आज इथे नसतो. माझ्यासाठी ती फजिती नव्हती, तर मोठा अपघात होता...

ही गोष्ट आहे १९७५-७६ मधली. मी इंटर बँक कॉम्पिटिशनच्या माध्यमातून एका बाल नाटकाद्वारे स्टेजवर पाय ठेवला होता. कॉलनीतील गणेशोत्सवामध्ये एक नाटक केलं होतं. तेथे बाळ धुरी पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी नाटक पाहून माझ्या कामाचं खूप कौतुक केलं. त्या काळी बाळ धुरी रंगभूमीवरचे टॉपचे नट होते. त्यांचं गुरू नाटक जोरात चाललं होतं. संगीत वरदान हे दुसरं नाटकही ते करत होते. त्यात बाळ धुरींसोबत डॉ. वसंतराव देशपांडे (बुवा), सुमतीबाई टिकेकर, मोहन कोठीवान असे मोठे कलाकार होते. अभिनेते अजित रेगेसुद्धा होते, जे गुरूमध्येही होते आणि स्टेट बँकेत नोकरी करायचे. एका प्रयोगावेळी रेगे यांना सुट्टी मिळाली नव्हती, तेव्हा धुरींनी मला त्यांच्या जागी तू काम करशील का, असं विचारलं. सर्वांनी सांगितल्यामुळे होकार दिला. दोन महिने तालमी केल्या. रंगीत तालीमही झाली. माझा त्या नाटकाचा पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरमध्ये होता. प्रयोग हाऊसफुल्ल...

दुसऱ्या अंकात माझी एंट्री... त्यातलं माझं नाव यासीन होतं. बुवा माझ्याकडे बघून जोराने ओरडतात, ‘यासीSSSन...’ ते ओरडल्यावर मी घाबरल्यासारखं करून खाली बघायचं होतं. बुवा ओरडल्यावर मी ठरल्याप्रमाणे मान खाली घातली आणि नंतर मान वर करून समोर पाहिलं. प्रेक्षकांना बघून घाबरलो. डोळ्यांसमोर अंधारी आली. एक वाक्य आठवेना. टोटली ब्लँक झालो. पाय थरथरायला लागले. तोंड सुकलं. बोबडी वळली. मी सुन्न होतो. सहज बुवांकडे पाहिलं. त्यांनी माझी अवस्था ओळखली. तिथून बुवांनी माझी वाक्यं अशा पद्धतीने घेतली की जणू काही झालंच नाही. 

पडदा पडल्यावर विंगेत धुरी डोळे वटारून माझ्याकडे बघत होते. मी सॉरी म्हटलं. ते म्हणाले की, तू पहिली बुवांची माफी माग. मी बुवांकडे गेलो. ते रेस्टरुममध्ये पहुडले होते. त्यांना मी सॉरी म्हणालो. त्यांनी पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, बाळा आज जे घडलं त्यात तुझी चूक नव्हती. ते म्हणाले, आम्ही चारशे-पाचशे प्रयोग करूनही वाक्य विसरतो. ती चूक त्या जागेची आहे. काही काळजी करू नकोस. तिसऱ्या अंकातील नक्कल पाठ आहे ना... मग रहा पुन्हा उभा. मी आहे, सांभाळून घेईन. मी विसरलो तरी त्यांनी योग्य ती काळजी घेतली होती. तिसरा अंक छान झाला. त्यावेळी बुवांसारखा ग्रेट कलाकार पाठीशी उभा राहिला नसता तर मी आज इथे नसतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शिवाजी साटमसेलिब्रिटी